लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेच्या १८६ केंद्रांवर शनिवारी लसीकरण केले जाणार आहे. १८१ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार असून, यातील ६० केंद्रांवर १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. तर ५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार आहे.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असलेल्या साठ्यापैकी ३० टक्के कोविशिल्ड लस ऑनलाईन अपॉईमेंट /स्लॉट बुक केलेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना पहिला डोस दिल्या जाणार आहेत. तर, ३० टक्के लस हेल्थ वर्कर, फ्रंटलाईन वर्कर यांना दिली जाणार आहे.
लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी शुक्रवारी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे. कोविशिल्ड लसीच्या साठ्यापैकी २० टक्के लस ज्या नागरिकांनी ८४ दिवसांपूर्वी (१० एप्रिल पूर्वी ) पहिला डोस घेतला आहे, त्यांना दिली जाणार आहे. तसेच उर्वरित २० टक्के लस ही हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व ४५ वर्षे वयावरील नागरिकांना ऑन दी स्पॉट नोंदणी करून दिली जाणार आहे़
-----
४ जूनपूर्वी डोस घेतलेल्यांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस
ज्या १८ वर्षांपुढील नागरिकांनी ४ जूनपूर्वी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना शनिवारी ५ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे. यातील ५० टक्के लस ही ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना व ५० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी केलेल्यांना दिली जाणार आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही.