लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “कोरोना लस विशिष्ट कालावधीत घेणे गरजेचे असून, कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींनीही लस घ्यावी. लस घेतलेल्या व्यक्तीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होणारच नाही, असे म्हणता येत नाही. लस घेतल्यानंतर व्यक्तीची प्रतिकारक्षमता वाढते. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे पालन काटेकोरपणे केलेच पाहिजे,” असा सूर सिंबायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरतर्फे आयोजित वेबिनारमध्ये निघाला.
सिंबायोसिस हॉस्पिटलतर्फे ‘व्हॅक्सिन्स अॅण्ड कोविड १९ : मिथस् वर्सेस् रिअॅलिटी’ या विषयावर शनिवारी (दि. १३) वेबिनार आयोजित करण्यात आले. यात जेन्नर इन्स्टिट्यूटचे संचालक लसीकरण तज्ज्ञ एडरिअन हिल, जागतिक आरोग्य संघटनेच्या सौम्या स्वामीनाथन, सिंबायोसिसचे अधिष्ठाता डॉ.राजीव येरवडेकर, सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक उमेश शाळीग्राम, प्रसाद कुलकर्णी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, डॉ.रमण गंगाखेडकर, सिंबायोसिस हॉस्पिटलचे सीईओ डॉ.विजय नटराजन यांनी भूमिका मांडली. सिंबायोसिसचे कुलपती डॉ.शां.ब. मुजुमदार, सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ.विद्या येरवडेकर, कुलगुरू रजनी गुप्ते यांचे या वेबिनारला सहकार्य लाभले.
एडरिअन हिल म्हणाले, “अमेरिकेतील तज्ज्ञांनी दीड ते दोन वर्षे कोरोनावर लस तयार करणे शक्य होणार नसल्याचे मत व्यक्त केले होते. मात्र, अवघ्या दहा महिन्यांत कोरोनावर लस तयार झाली, ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. कोरोना लस घेताना बारा आठवड्यांचे अंतर आदर्शवत आहे. पहिला डोस घेतल्यानंतर ७० ते ७६ टक्क्यांपर्यंत प्रतिकार क्षमता वाढते, तर दुसऱ्या डोसनंतर ती ९० टक्क्यांपर्यंत जाते. दोन डोसमधील अंतरात एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, तसेच त्याच्यामुळे दुसऱ्या व्यक्तीलाही कोरोनाची लागण होऊ शकते. कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींमध्ये प्रतीपिंड (अॅण्टीबॉडीज) तयार झालेल्या असतात. त्यांनी लस घेतली, तर त्यांना अधिक ताकद मिळते.”
डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली, त्यावेळी चीनने जगाला सर्व माहिती उपलब्ध करून दिली. चीनकडून लस निर्मितीच्या दृष्टीने आवश्यक माहिती प्राप्त झाल्याने, लस लवकर तयार करणे शक्य झाले. देशातील सर्व शास्त्रज्ञांनी व तंत्रज्ञांनी आपले संशोधन एकमेकांना दिले पाहिजे. त्यामुळे भविष्यात आवश्यक गोष्टींवर काम करणे सोपे होईल, तसेच विकसित देशांनी अविकसित राष्ट्रांना सहकार्याच्या भूमिकेतून योग्य प्रमाणात आणि गुणवत्तापूर्ण लस उपलब्ध करून द्यायला हवी.
--------------------