पुणे : तरुण वाचत नाहीत, त्यांना इतिहास माहित नाही अशी अाेरड सातत्याने हाेत असते. परंतु तरुणांना साहित्य उपलब्ध करुन द्यावे, त्याबाबत रुची निर्माण करावी या दिशेने फारशी पाऊले उचलली जात नाहीत. पुण्यात पुस्तकं वाटणारा एक तरुण असून जास्तीत जास्त लाेकांनी वाचावं, माहिती मिळवावी यासाठी ताे एक लक्ष माेफत पुस्तक वाटण्याचा उपक्रम राबवताेय. हर्षल लाेहकरे असे या तरुणाचे नाव असून त्याने अात्तापर्यंत पुणे, अहमदनगर, सांगली, बीड या ठिकाणी तब्बल 10 हजाराहून अधिक विविध सामाजिक विषयांवरील पुस्तके वाटली अाहेत. त्याचा हा उपक्रम सर्वच वाचनप्रेमींसाठी प्रेरणादायी अाहे.
लाेकांमध्ये वाचनाचा प्रसार व्हावा हा संकल्प घेऊन 2015 पासून हर्षल माेफत पुस्तके वाटत अाहे. या उपक्रमात त्याला त्याच्या मित्रांची साथ मिळत अाहे. लाेकांना नेमकी कुठली पुस्तके वाचावित हे अनेकदा समजत नसते. तसेच अनेक पुस्तकांच्या किंमती या प्रचंड असल्याने लाेकांना ती खरेदी करुन वाचने शक्य नसते. लाेकांनी पुस्तकं वाचलीच नाहीत तर ते विचार करु शकणार नाहीत. त्यामुळे लाेकांनी पुस्तके वाचून विचार करावा यासाठी हर्षलचा पुस्तके माेफत वाटण्याचा अाटापीटा सुरु अाहे. शालेय, महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील पुस्तके मिळाल्यास त्यांच्यात वाचनाची गाेडी निर्माण हाेईल. तसेच विद्यार्थी विचार करायला सुरुवात करुन एक सुंदर भारत घडवतील असे हर्षलला वाटते.
हर्षल म्हणताे, लाेकांनी जास्तीत जास्त वाचलं पाहिजे. तेव्हाच ते विचार करायला सुरुवात करतील. काही जणांच्या घरी अनेक पुस्तके असतात. त्यातील बरीच पुस्तके वाचली जात नाहीत. अशी घरात पडून असलेली पुस्तके बाहेर पडली पाहीजेत. तरुण वाचत नाहीत असं काही नाही, तरुणांना साहित्य उपलब्ध करुन दिलं जात नाही. अाम्ही एक लक्ष माेफत पुस्तके वाटण्याचा संकल्प केला अाहे. सध्या 10 हजाराहून अधिक पुस्तके वाटली अाहेत. मित्रांच्या, अामच्या अादर्शांच्या तसेच नातेवाईकांच्या वाढदिवसाला अाम्ही पुस्तके वाटताे. प्रत्येकाने वाढदिवासाला भेटवस्तू देण्याएेवजी पुस्तके भेट दिली पाहिजेत. याने वाचन चळवळ वाढीस लागेल.