चंदननगर : गेल्या तीन महिन्यापूर्वी आनंदपार्क येथील महावितरणच्या उघड्यावरील रोहित्राला तेरा वर्षीय बालकाचा स्पर्श झाला. त्यात त्याला अतिशय तीव्र झटका बसला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अंकुश खंडू बनसोडे (वय १३, रा. गणेशनगर वडगावशेरी) असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अंकुश बनसोडे हा वडगाव शेरी येथील आनंदपार्क बसस्थानकाशेजारी २४ एप्रिल रोजी दुपारी खेळताना विजेचा धक्का लागला होता. राहुल दळवी, सतीश माने, अशिष माने, प्रकाश धोत्रे यांनी पाहताक्षणी मुलाला रुग्णालयात दाखल केले होते. काही दिवसांपूर्वी उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले होते;मात्र प्रकृती पुन्हा खालावली म्हणून रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचे रविवारी निधन झाले.वडगावशेरी महावितरण व विमाननगर महावितरण विभागाचा सातत्याने भोंगळ कारभार सुरू असून त्यांच्या चुकीची शिक्षा सर्वसामान्य नागरिकांनी जीव गमावून भोगावी लागत असताना वडगावशेरी, नगररस्ता, विमाननगर, खराडी, लोहगाव सर्व भागातील रोहित्र, डीपी उघड्या तशाच असून त्याकडे लक्ष द्यायला महावितरणला वेळच नाही. महावितरणच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अंकुश बनसोडेच्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे अशी मागणी अशिष माने, राहुल दळवी, सतीश माने, प्रकाश धोत्रे यांनी केली आहे.
गेल्या तीन महिन्यांत दुसरा बळी....
मार्च महिन्यात नगर रस्त्यावर टाटागार्डरूम चौकातून पुढे आल्यावर ट्रक चालकाला उघड्या डीपीचा शॉक लागून होरपळून मृत्यू झाला त्याची तर ओळखही पटत नव्हती त्यानंतर अंकुश बनसोडे याचा मृत्यू चटका लावणारा असून त्याची घरची परिस्थिती हलाखीची आहे.