Vadgaonsheri Vidhan Sabha Election 2024: वाढलेली टक्केवारी अन् भाजपची मते कुणाच्या पथ्यावर ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 10:49 AM2024-11-22T10:49:06+5:302024-11-22T11:00:05+5:30

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी ?

Vadgaonsheri Vidhan Sabha Election 2024 Increased percentage and votes of BJP on whose path | Vadgaonsheri Vidhan Sabha Election 2024: वाढलेली टक्केवारी अन् भाजपची मते कुणाच्या पथ्यावर ?

Vadgaonsheri Vidhan Sabha Election 2024: वाढलेली टक्केवारी अन् भाजपची मते कुणाच्या पथ्यावर ?

Pune : वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात १६ उमेदवार असले तरी खरी लढत ही भाजपमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेऊन उभे असलेले बापूसाहेब पठारे आणि अजित पवार गटाचे सुनील टिंगरे यांच्यातच झाली आहे.

आमदार असताना मतदारसंघात केलेली कामे व जनसंपर्क या जोरावर बापूसाहेब पठारे हे मताधिक्याने निवडून येणार, असा दावा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते करत आहेत. त्याउलट अजित पवार गटाचे सुनील टिंगरे यांनी केलेली १५१९ कोटींची विकासकामे, स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची फळी, सामान्यांसाठी केलेली कामे व भाजपचे परंपरागत मतदान यांची सांगड त्यांनी योग्य पद्धतीने बसवल्याने टिंगरे हेच विजयी होणार, असा ठाम विश्वास खुद्द उमेदवार टिंगरे व त्यांच्या समर्थकांना वाटतो आहे.

गत निवडणुकीत मतदारांची संख्या ४,४४,४७१ होती, ती आता ५,०३,५३९ एवढी झाली. ५९ हजार नवमतदार वाढले आहेत. त्यातही झालेल्या मतदानाची एकूण टक्केवारी ५६.२१ टक्के असून, गत निवडणुकीपेक्षा त्यात ९.२९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता ही वाढलेली टक्केवारी व भाजपमधील उघडपणे दिसलेली नाराजी कुणाच्या पारड्यात जाणार हे उद्याच्या मतमोजणीनंतर समजेल.

भाजपचा उमेदवार नसल्याने नोटा फॅक्टर वाढेल असा अंदाज आहे. लोहगाव भागातील उत्तर भारतीयांचे मतदान करून घेण्यात टिंगरेंचे समर्थक व भाजपचे पदाधिकारी यशस्वी झाले आहेत. त्यामुळे लोहगाव, विश्रांतवाडी, धानोरी, टिंगरे नगर भागात टिंगरे व पठारे यांना कमी अधिक मताधिक्य राहू शकते. येरवडा, विमाननगर, कल्याणीनगर, वडगावशेरी, खराडी, मांजरी या भागात पठारे यांना मताधिक्य राहू शकते.

भाजपच्या बहुतांश कार्यकर्त्यांची भूमिका शंका यावी अशीच होती, हे उघड दिसत होते. त्याचा फायदा पठारे यांना होऊ शकतो. भाजपचे माजी नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे प्रचारात कोठे दिसले नाहीत. रेखा टिंगरे यांच्या प्रवेशामुळे पठारे यांना येथे फायदा होऊ शकतो.

प्रभाग दोनमध्ये स्वत: टिंगरे नगरसेवक राहिले आहेत तरी लोकसभा निवडणुकीत येथून महाविकास आघाडीला मताधिक्य होते ही बाब लक्षणीय आहे. पोर्से प्रकरण, पब संस्कृतीमुळे रात्रीस चालणारा खेळ याचा त्रास राजमाता जिजाऊ ॲाक्सिजन पार्क बांधल्याने कमी होतो असे मतदारांना वाटते का, हेही निकालानंतर समजेल. प्रभाग ६ हा स्लम एरिया असून, निर्णायक ठरू शकतो.

Web Title: Vadgaonsheri Vidhan Sabha Election 2024 Increased percentage and votes of BJP on whose path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.