पुणे : बडोदा येथे होत असलेल्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने गुजरात आणि महाराष्ट्रातील अनुबंध अधिक दृढ होणार आहेत. संमेलनाच्या माध्यमातून भाषा आणि संस्कृतीची वीण घट्ट व्हावी, यासाठी महाराष्ट्रासह गुजरात सरकारनेही पुढाकार घेतला आहे. संमेलनासाठी २५ लाख रुपयांची मदत करण्यास गुजरात सरकारतर्फे हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. निधीची रक्कम ५० लाखांपर्यंत वाढवण्याच्या दृष्टीने मराठी वाङ्मय परिषदेकडून शासनाला निवेदन देण्यात आले असून येत्या मंगळवारी (२३ जानेवारी) मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची भेट घेण्यात येणार आहे.द्रष्टे राजकारणी, कलेची, साहित्याची उत्तम जाण असलेला नेता अशी ओळख असलेल्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांची कर्मभूमी असलेल्या बडोदा नगरीत यंदाचे साहित्य संमेलन होत आहे. संमेलनात गुजराती अणि मराठी भाषेचे पूर्वीपासूनचे ॠणानुबंध, इतिहासातील वीण, अनुवादित साहित्य या रुपातील संबंधांना बळकटी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहेत. त्यासाठी विविध विषयांवर आधारित परिसंवाद, भाषेच्या आदानप्रदानासाठी पुस्तक प्रकाशने आदी कार्यक्रमांवर भर देण्यात येणार आहे.पिंपरी चिंचवड येथील साहित्य संमेलनाने कोट्यवधींची उड्डाणे घेतली आणि साहित्यप्रेमींच्या अपेक्षा उंचावल्या. त्यातुलनेत डोंबिवली येथे झालेल्या संमेलनात रसिकांच्या पदरी निराशा पडली. मराठी वाङ्मय परिषदेतर्फे ९१ वे संमेलन बडोद्यात आयोजित करण्यात आले असून, निरर्थक खर्च टाळून साहित्यविषयक उपक्रम राबवण्यावर भर देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने दसऱ्याच्या मुहूर्तावर २५ लाख रुपयांचा निधी महामंडळाच्या खात्यात जमा केला. महामंडळाने हा निधी आयोजक संस्थेकडे सुपूर्त केला आहे. संमेलन बडोद्यामध्ये होत असल्याने गुजरात सरकारनेही संमेलनाला आर्थिक मदत करावी, यादृष्टीने शासनाला निवेदन देण्यात आले होते. गुजरातच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मदतीचे आश्वासन दिले होते. निवडणुकांनंतर नवीन मंत्रिमंडळ कार्यरत झाल्यानंतर संमेलनाचा विषय काहीसा मागे पडला होता. संमेलन एक महिन्यावर येऊन ठेपलेले असताना शासनाकडून २५ लाख रुपयांच्या अनुदानासाठी हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. हा निधी वाढवण्याच्या दृष्टीने २३ जानेवारीला मुख्यमंत्री रुपाणी यांची भेट घेणार असल्याचे मराठी वाङ्मय परिषदेचे दिलीप खोपकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.खोपकर म्हणाले, ‘महाराष्ट्राप्रमाणे गुजरात शासनाच्या धोरणांमध्ये संमेलनासाठी ठरावीक रकमेच्या निधीची ठोस तरतूद नाही. मात्र, पुढील महिन्यात बडोदा येथे संमेलन होत असताना सरकारने मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदत देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळे साहित्यविषयक उपक्रमांना चालना मिळण्यास मदत होणार आहे.’घुमान येथे झालेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पंजाब सरकारने सर्वतोपरी सहाय्य केले होते. संमेलनाला राज्य सरकारचा अधिकृत दर्जा मिळाला होता. हीच परंपरा पुढे नेत गुजरात सरकारने बडोदा येथे होत असलेल्या ९१ व्या साहित्य संमेलनाला राज्य सरकारचे अधिकृत संमेलन म्हणून सर्वतोपरी मदत करावी, अशा आशयाचे पत्र ८८ व्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष भरत देसडला यांनी नरेंद्र मोदी यांना लिहिले होते. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनाही त्यांनी पत्राद्वारे निवेदन दिले असून, सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
बडोदा साहित्य संमेलन अनुदानास गुजरात शासनाकडून हिरवा कंदिल; ५० लाखांसाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 6:04 PM
बडोदा येथे होत असलेल्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी २५ लाख रुपयांची मदत करण्यास गुजरात सरकारतर्फे हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे.
ठळक मुद्देनिरर्थक खर्च टाळून साहित्यविषयक उपक्रम राबवण्यावर देण्यात येणार भरमहाराष्ट्र शासनाने दसऱ्याच्या मुहूर्तावर २५ लाख रुपयांचा निधी महामंडळाच्या खात्यात केला जमा