कोरेगाव भीमा : छत्रपती संभाजी महाराजांचे समाधिस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरुर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी चौथ्यांदा सत्ता मिळविणाऱ्या श्री उधोबा ग्रामविकास पॅनेलचे अनिल भाऊसाहेब शिवले, तर उपसरपंचपदी हिरालाल तांबे यांची बिनविरोध निवड झाली.
छत्रपती शंभूराजांचे समाधिस्थळ असलेल्या वढू बुद्रुक ग्रामपंचायतीत श्री उधोबा ग्रामविकास पॅनेलने चौथ्यांदा निर्वीवाद वर्चस्व प्रस्थापित करुन सत्ता आपल्या हातात ठेवली आहे. यात उधोबा पॅनेलला नऊ जागा तर श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलला चार जागा मिळाल्या होत्या. सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत सरपंचपदासाठी अनिल शिवले यांनी तर उपसरपंच पदासाठी हिरालाल तांबे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंचपदी अनिल भाऊसाहेब शिवले व उपसरपंचपदी हिरालाल जगन्नाथ तांबे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बंडू जाधव यांनी सांगितले. ग्रामविकास अधिकारी मिलिंद केंज, पोलीस पाटील जयसिंग भंडारे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री उधोबा ग्रामविकास पॅनेलचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, अंकुश शिवले, माजी चेअरमन राजाराम आहेर, माजी उपसरपंच संतोष शिवले, रमाकांत शिवले, बबन शिवले, संजय शिवले, योगेश आरगडे यांसह नवनिर्वाचित सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच अनिल शिवले व उपसरपंच हिरालाल तांबे यांनी छत्रपती संभाजी महाराज समाधिस्थळाचा विकास करण्याबरोबरच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना सर्वसमान्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.
जनतेच्या कौलास सार्थ ठरविणार
श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील जनतेने सलग चार पंचवार्षिक सत्ता श्री उधोबा ग्रामविकास पॅनेलला दिली असल्याने जनतेचा चौकाररुपी कौल सार्थ ठरवीत शंभू छत्रपतींच्या समाधिस्थळाचा विकास करणार असल्याचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी सांगितले.
२५ कोरेगाव भीमा वढु
नवनिर्वाचित सरपंच अनिल शिवले, उपसरपंच हिरालाल तांबे यांचा सत्कार करताना मान्यवर.