पुणे : खरं सांगु मला खुप आनंद होतो आहे. माझ्या वाढदिवसाला इतके सगळे जण आले आहेत त्यामुळे खुप भारी वाटत आहे. कुणी मला द्यायला गिफ्ट आणले आहे तर कुणी खाऊ आणला आहे. या आनंदात मी सर्वांना ’’बदन पे सितारे लपटे हुए’’ हे गाणे गाऊन दाखवले. तर अंबाबाई कृपा कर या गाण्यावर डान्स करुन दाखवला. सगळे माझे कौतुक करीत होते. मला शुभेच्छा देत माझे अभिनंदन केले. तो दिवस खुप मजेचा होता. वैशालीच्या चेह-यावर वाढदिवसाचा आनंद ओसंडून वाहत होता.
वैशालीचा दहावा वाढदिवस नुकताच सोफोश येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी पुण्यातील हडपसर येथे राहणा-या वैशाली यादव हिच्या हदयाला छिद्र असल्याचे कळताच यादव कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आर्थिक संकट समोर उभे राहिले. पुरेशा मदतीअभावी तिच्या हदयावरील शस्त्रक्रिया करता येणार नाही. हे तिच्या काका प्रताप यादव यांना माहिती होते. काय करावे, कुणाकडे मदत मागावी यावर बराच विचार करुन झाला. मात्र काही प्रभावी उपाय सुचेना. यानंतर चिमुकल्या वैशालीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले. त्यात आपल्याला मदत करण्यात यावी. असे आवाहन करण्यात आले होते. विशेष म्हणजे पीएमओ कार्यालयाकडून तिच्या पत्राची दखल घेण्यात आली. आणि रुबी हॉस्पिटलमध्ये तिच्या हदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्या शस्त्रक्रियेतून पूर्णपणे सावरत ब-या झालेल्या वैशालीने बुधवारी आपला वाढदिवस सोफोश संस्थेत साजरा केला. संगीतकार व अभिनेते संदीप पाटील, सोफोशच्या प्रशासकीय अधिकारी शर्मिला सय्यद, वैशालीचे वडिल, आजी, काका याबरोबरच सोफोशमधील कर्मचारीवृंद वाढदिवस साजरा करण्याकरिता उपस्थित होता. याप्रसंगी सभागृहाची आकर्षक सजावट करुन,रंगीबेरंगी फुगे चिटकवत, लहान मुलांच्या विशेष उपस्थितीत वैशालीच्या जन्मदिवसाचा आनंद व्दिगुणीत करण्यात आला.
पंतप्रधान कार्यालयातून अधिकारी श्रीकर परदेशी यांनी पंतप्रधानांच्यावतीने वैशालीला तब्येतीची काळजी घेण्याचा, भरपूर अभ्यास करुन खुप मोठी हो. अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या. वैशालीने पंतप्रधानांना थॅंक्यू म्हणून त्यांचे आभार मानले. सोफोशमधील वातावरण तिला मनापासून आवडते. वाढदिवशी तिने सादर केलेला डान्स पाहून पाटील यांनी येत्या 20 जानेवारी रोजी होणा-या सांगत्ये ऐका या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याचे वैशालीचे काका प्रताप यादव यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधानांना केलेल्या मदतीच्या अर्जामुळे त्यांनी वैशालीला मदत करण्यासंदरर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाला शस्त्रक्रिया करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तिच्यावर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले. या उपचारांनंतर वैशालीने तिचा दहावा वाढदिवस अनाथ मुलांच्या सोफोश संस्थेत साजरा करण्यात आला.
आता कुठेही दुखत नाही...तब्येतीत सुधारणा होत आहे. शाळा व्यवस्थित सुरु आहे. यापूर्वी छातीचे दुखणे चालु असायचे. आता मात्र शस्त्रक्रियेनंतर त्यात खुप फरक पडला आहे. पहिल्यासारखी चक्कर येत नाही. मी व्यवस्थित अभ्यास करु शकते, माझ्या आवडीची गाणी म्हणू शकते, डान्स करते. दुखण्याचा विसर पडला असून आता कुठेही दुखत नसल्याची भावना वैशाली आनंदाने व्यक्त करते.