वाल्हे : ‘पुंडलिक वरदे, हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम’ च्या गजरात, वैष्णवांचा मेळा आज आद्य रामायणकार महर्षी वाल्मीकी ऋषीनगरीत दाखल झाला. श्री विठ्ठल-रुक्मिणी समिती पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरहून आळंदीकडे श्री ज्ञानेश्वरमहाराज समाधी सोहळ््यासाठी निघालेला श्री पांडुरंग व नामदेवमहाराज पालखी सोहळा बुधवारी वाल्हेनगरीत मुक्कामी विसावला.सातारा जिल्ह्यातील सुरवडी मुक्कामानंतर पालखी सोहळा पंढरपूरकरडे मार्गक्रमण करताना पुणे जिल्ह्यातील नीरा नदीवरील दत्तघाटावर पांडुरंगांच्या पादुकांना शाही स्नान घालण्यात आले. तदनंतर संध्याकाळी पावणेसात पालखी सोहळा वाल्हेनजीक माळवाडी येथील पालखीतळावर विसावला. तदनंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत नयनरम्य अश्वांचा रिंगण सोहळा पार पडल्यानंतर समाज आरती झाल्यानंतर दर्शनाच्या रांगा लागल्या.समाजआरंतीनंतर वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच कल्पना गोळे, उपसरपंच पोपटनाना पवार, सूर्यकांत पवार, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश सूर्यवंशी, वंदना गायकवाड, मीनाक्षी कुंभार, दादा मदने, गावकामगार तलाठी नीलेश पाटील उपस्थित होते.पालखी सोहळ्यामिनित्त वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने माळवाडी येथील पालखीतळाची स्वच्छता करून संपूर्ण पालखीतळावर ठिकठिकाणी लाईट, तसेच पिण्याच्या पाण्याची, पाण्याचे टँॅकर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. जेजुरीचे सहायक पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हे पोलीस दूरक्षेत्राचे दीपक वारूळे, संदीप पवार, गणेश कुतवळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.नीरा : श्री संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पादुका मागील चार वर्षांपासून आळंदीला जात आहेत. आज बुधवारी पांडुरंगाच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तीर्थात मोठ्या भक्तिमय वातावरणात स्नान घालण्यात आले. सातारा जिल्ह्यातील मुक्काम आटोपून पुणे जिल्ह्यात प्रवेश केला.पंढरपूरच्या पांडुरंगाचे सेवेकरी कै. तात्यासाहेब वासकर यांनी संजीवन समाधीला पांडुरंगाच्या पादुका आळंदीला घेऊन जाण्याची मागणी केली होती. प्रत्यक्ष पांडुरंग समाधी सोहळ्यासाठी हजर असतात, अशी वारकºयांची श्रद्धा आहे. वासकरांचे म्हणणे मागील काळात विठ्ठल मंदिर समितीने मान्य करून सोहळा सुरू केल्याचे विठ्ठलराव (दादासाहेब) वासकरमहाराज यांनी सांगितले.यावर्षी सोहळ्यासोबत रथाच्या पुढे १४ व रथामागे ८ दिंड्या चालत आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण, तसेच कर्नाटकातील वारकरी पांडुरंगाच्या वारीत सहभागी झाले आहेत. सुमारे पंधरा हजार वारकरी सोहळ्यात सहभागी असल्याची माहिती सोहळाप्रमुख मयूर ननवरे यांनी दिली.कार्तिकी पौर्णिमेला पांडुरंगाचा पालखी सोहळा पंढरपूर येथून निघाला आहे. अष्टमीला आळंदीला दाखल होणार आहे.सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथील मुक्काम आटोपून सकाळी लोणंद येथे न्याहरी घेऊन दुपारच्या विसाव्यासाठी नीरा नदीतील प्रसिद्ध दत्तघाटावर सकाळी अकरा वाजता दाखल झाला. या वेळी रथातील पालखी दत्त मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली. पालखीतील पांडुरंगाच्या पादुकांना मोठ्या भक्तिमय वातावरणात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात स्नान घालण्यात आले.
वैष्णवांचा मेळा पुणे जिल्ह्यात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 4:58 AM