बावडा : पांडुरंगदर्शनाच्या ओढीने ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर व विठ्ठलनामाच्या जयघोषात व टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे वाटचाल करणारा संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीतील लाखो वैष्णवांचा मेळा मंगळवारी सायंकाळी सराटी गावी नीरा नदीकाठी विसावला. अवघीच तीर्थे घडली, एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया!अवघीच पापे गेली, दिगंतरी वैकुंठपंढरी देखिलिया!! पांडुरंगाच्या भेटीसाठी ओढ लागलेला वैष्णव विठुनामाचा धावा करीत सराटीत दाखल झाला. त्यावेळी इंदापूर बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, पंचायत समितीचे सदस्य प्रदीप जगदाळे, हनुमंतराव कोकाटे, महेश जगदाळे, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थांनी तोफांच्या सलामीत पालखीचे स्वागत केले. त्यानंतर पालखी खांद्यावर वाहून नेऊन मुक्कामी ठिकाणी स्थानापन्न करण्यात आली.यावेळी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, तालुका वैद्यकीय अधिकारी सारिका पोळ, बावड्याचे वैद्यकीय अधिकारी कपिलकुमार वाघमारे, पोलीस निरीक्षक श्री. पवार, सहायक पोलीस निरीक्षक अजित जाधव आदी उपस्थित होते.पुणे जिल्ह्यातील आजचा हा शेवटचा मुक्काम असून उद्या सकाळी पालखी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये प्रवेश करणार आहे. तत्पूर्वी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तुकारामांच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात येणार आहे.
वैष्णवांचा मेळा सराटीत विसावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 9:32 PM
पंढरपूरकडे वाटचाल करणारा संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीतील लाखो वैष्णवांचा मेळा मंगळवारी सायंकाळी सराटी गावी नीरा नदीकाठी विसावला.
ठळक मुद्देपुणे जिल्ह्यातील आजचा हा शेवटचा मुक्काम उद्या सकाळी पालखी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये प्रवेश करणार