पुणे : अटलबिहारी वाजपेयी यांनी नेहमी सर्वसामान्य व्यक्ती केंद्रस्थानी ठेवली. त्यांच्याबरोबर दौ-यासाठी असलेल्या ड्रायव्हरपासून कार्यकर्त्यापर्यंत सगळ्यांची विचारपूस करून ते काळजी घ्यायचे. सत्तेच्या अतिउच्च पातळीवर असताना देखील ही निरागसता आणि जाणीव ठेवणारे वाजपेयी हे एकमेव राजकारणी होते. म्हणूनच ते भारतीय राजकारणावर त्यांचा ठसा उमटवू शकले, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पज्ञ, संस्कृती प्रतिष्ठान आणि संवादतर्फे अटल विहारी वाजपेयी यांच्या हिंदी कवितांवर आधारित गीत, संगीत, नृत्य कला अविष्काराने सजलेल्या गीत नया गाता हूँ अटल कवितांएँ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते विद्या वाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांना पहिला अटल संस्कृती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक गो.बं. देगलुरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मुरली मोहोळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, महेश लडकत, डॉ. माधवी वैद्य, उज्जवल केसकर, नगरसेविका वासंती जाधव, मोनिका मोहळ आदी मान्यवर उपस्थित होते. गिरीश बापट म्हणाले, ह्यहजारो कीर्तन आणि व्याख्यानांच्या माध्यमातून अभ्यंकरांनी दुर्गम भागात सर्वसामान्यांच्या भाषेत आणि त्यांच्यातीलच एक होऊन ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, वेद पोहोचवले आहेत. पोथीपासून थेट कानापर्यंत महत्त्वाचे कार्य अभ्यंकरांनी केले आहे. डॉ. शंकर अभ्यंकर म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाचा हा पुरस्कार स्वीकारताना अंतर्मन कंपित होत आहे. वाजपेयींचे काम हिमालयासारखे होते. हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझे माता-पिता, शिक्षक, अध्यापक, वैदिक वाङ्ममय यांचा हा पुरस्कार आहे. बारा-चौदा वर्षांपासून राजकारणापासून दूर राहूनही वाजपेयींचा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर विसर पडला नाही. त्यांनी आयुष्यभर राष्ट्रधर्म पाळला.यावेळी गो.बं. देगलूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. -----------------सुनील महाजन निर्मित आणि डॉ. माधवी वैद्य लिखित गीत नया गाता हूँ हा कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला. मुरलीधर मोहोळ यांची संकल्पना आणि संयोजन असलेल्या या कार्यक्रमाचे निवेदन चित्रपट अभिनेत्री अनुजा साठे- गोखले यांनी केले. योगिता गोडबोले आणि संदिप उबाळे यांनी अटलजींच्या कवितांना स्वरसाज चढवला. चित्रपट अभिनेत्री शर्वरी जमेनीस यांनी नृत्य सादर केले. केदार परांजपे, मिहीर भडकमकर, अपूर्व द्रविड, पराग पांडव आणि आदित्य आपटे यांनी साथसंगत केली.
सत्ताधारी काळात देखील निरागसता जपणारे वाजपेयी एकमेव राजकारणी : गिरीश बापट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 6:05 PM
त्यांच्याबरोबर दौ-यासाठी असलेल्या ड्रायव्हरपासून कार्यकर्त्यापर्यंत सगळ्यांची विचारपूस करून ते काळजी घ्यायचे.
ठळक मुद्देशंकर अभ्यंकर यांना अटल संस्कृती पुरस्कार गीत, संगीत, नृत्य कलाविष्कार गीत नया गाता हूँ सांस्कृतिक कार्यक्रम