- प्रशांत ननवरे
बारामती (पुणे) : सोमवारी (दि. ७) सुरू झालेल्या मैत्री, ममता, प्रेमाचा संदेश देणाऱ्या रोझ डे पासून विविध ‘डेज’ ‘सेलिब्रेशन’मध्ये सध्या तरुणाईची सर्वत्र धूम आहे. यंदा जगातील सात आश्चर्य, बोलणारा टेडी, रोझ कॅडबरी, चॉकलेट कपल, टेडीच्या आकाराचे मोठे चॉकलेट आदी भारतीय तसेच तुर्की, इटली, मलेशियन चॉकलेट्सची चांगलीच क्रेझ आहे. त्यावर हजारो रुपयांची उधळण करण्यात तरुणाई व्यस्त असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
‘व्हॅलेंटाईन डे’ सह विविध डेजच्या पार्श्वभूमीवर ‘डे’ज साजरे करण्यात यंदा तरुणांबरोबरच तरुणी देखील मागे नाहीत हे विशेष.आपल्या आवडत्या पार्टनरला जगातील सात आश्चर्य समजल्या जाणाऱ्या परदेशातील ठिकाणी आपण नेऊ शकत नाही; मात्र त्या जागतिक आश्चर्य मानल्या जाणाऱ्या विविध प्रतिकृतींसमोर आपल्या पार्टनर बरोबर नाते गुंफण्यांतच तरुणाई यंदा व्यस्त आहे.यामध्ये बाजारात बुर्ज खलिफा,मिलाद टॉवर,ओरिएंट टॉल टॉवर आदी जागतिक आश्चर्यांच्या प्रतिकृती बाजारात आहेत.त्याला तरुण आणि तरुणींकडून मागणी होत असल्याचे येथील मॅजेस्टिक गिफ्टचे राजेंद्र आहेरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
याशिवाय गुलाबाचे वेगवेगळे प्रकार, म्युझिकल लाईट, कॉफी मग, कपल मग, गोल्डन, टेडी बुके, संगीतावर लयबद्ध होणारे गुलाब, टेडी, कलर म्युझिकल पिलो, कपल टेडी, गिफ्ट बॉक्सेस, काचेचा गोल, चौकानी आणि आयताकृती काचेमध्ये नाचणारे स्वच्छंदी जोडपे, बर्फात बसलेले प्रपोज करणारे ‘डान्सिंग कपल’तसेच ‘आय लव्ह यू’ आणि ‘आय मिस यू’ बोलणारा टेडी, लीप्सच्या आकाराचे टेडी चांगलेच भाव खात आहेत. टेडी डे ला म्युझिकल कपल, पांडा, युनिकॉर्न, ऑक्टोपस टेडीला मोठी मागणी आहे.
किस डे निमित्त लिप्स चॉकलेट, लीप्स सॉफ्ट टॉईज, गिटार, पियानो, आलिंगन दिलेला शो पीस, मोठे शो पीस, परफ्यूम, वॉलेट, वॉचेस, ब्रेसलेट, पेडंट, डिओ, प्रेमाचा संदेश देणारी सुगंधी, रंगीत मेणबत्ती, सेव्हन बॉटल, डॉल्स, कृत्रिम फुले, हातातील ब्रेसलेट, कपल रींग, शो पीस, मिनियन कार्टुन, टेडी चॉकलेट,डान्सिंग टेडी, व्हिजिट बॉक्स, मॅग्नेटिक टेडी, क्रिस्टल किचन, लेडिज वॉलेट, शोपीस, पेअर टेडी,हार्ट,सोनेरी मखमली आवरण असणारे चॉकलेट, चॉकलेट बुके, टेडी,रोझ आदी बाजारात असल्याचे राजेंद्र आहेरकर यांनी सांगितले.
...‘डे’ज च्या शेवटी ‘ब्रेकअप’ ‘डे’
७ फेब्रुवारीला ‘रोज डे’,८ ला प्रपोज,९ चॉकलेट,१० टेडी,११ प्रॉमिस,१२ किस,१३ ‘हग’,१४ व्हॅलेंटाईन,तर १५ ला स्लॅप डे,१६ किक डे,१७ परफ्युम ,१८ फ्लर्टींग,१९ ला कन्फ्युजन,२० ला मिसिंग,तर २१ फेब्रुवारीला चक्क ‘ब्रेकअप’ डे आहे. त्यामुळे ७ तारखेला प्रेमाचे मैत्रीचे नाते गुुंफण्याचा सुरू झालेला काहीजणांचा प्रवास शेवटच्या दिवशी थांबण्याची देखील संधी आहे. वेगवेगळ्या ‘डे’ज चा पंधरवडा ‘ब्रेकअप’ डे ला समाप्त होणार आहे.
...सारं जग नवं-नवं वाटू लागतं
प्रेमासह विविध ऋणानुबंध निर्माण करण्यासाठी ‘ग्रीटिंग’ ला एकेकाळी चांगलीच मागणी असते. यंदा थेट व्हॅलेंटाईन चा संदेश देणारी ग्रीटिंग बाजारात आहेत. एकदा प्रेमात पडल्यावर सारं जगच नवं नवं वाटू लागतं...मनाचे अंतरंग नव्याने फुलू लागतं. सारं काही वेगळंच भासू लागतं. प्रेम म्हणजे उत्तरांना पडलेले गोड गोड प्रश्न. प्रेमाची एक फुंकर...तुझी आठवण हाच आहे माझ्या जीवनातील एक अनमोल क्षण...ग्रीटिंगच्या आदी संदेशांनी प्रेमवीरांचे लक्ष वेधले आहे; मात्र सोशल मीडियाच्या काळात ‘हायटेक’ यंत्रणांमुळे ग्रीटिंगचा पर्याय काहीसा मागे पडल्याचे दिसून येते.