श्रीकिशन काळे
पुणे : वसंतऋतू येताना निसर्ग बदलतो अन् पानगळ सुरू होते. वसंतऋतूमुळे सृष्टीला बहार येत आहे. त्यासाठी वृक्षदेखील नटून-थटून स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. अनेक वृक्षांवर फुलं-फळं आल्याने पक्ष्यांसाठी ते ज्यूस बार ठरत आहेत. त्यातच जर घराच्या आजूबाजूला खूप झाडी असेल आणि सोबत चांगल्या कॅमेऱ्याची साथ असेल तर बहरणाऱ्या निसर्गाला कैद करता येऊ शकते. या निसर्गातील पक्षिवैभव ‘लोकमत’साठी हौशी छायाचित्रकार मेधा चांदोरकर यांनी टिपले आहे. ‘हदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे...’ असेच गाणं या व्हॅलेंटाईन दिनी पक्ष्यांना पाहून मनी येते.
वसंतऋतू येताना भवतालचे वातावरण बदलते. वृक्षांसाठी हा काळ म्हणजे पाने टाकून देण्याचा, पर्णवैराग्य स्वीकारून पुन्हा फुलण्याचा आहे. या वसंतात पळस, पांगारा, सावरी, अंजन, शिरीष, गणेश अशी अनेक झाडे फुलतात आणि त्यावर पक्ष्यांचे जणू काही संमेलनच भरलेले पहायला मिळते. पक्ष्यांच्या नजरेला या वृक्षांवरील भडक रंगाची फुले आकर्षूून घेतात. त्यातील मकरंद चाखायला पक्षी गर्दी करतात. आपल्याकडे वसंत ऋतू हा फेब्रुवारी मध्यापासून ते एप्रिलच्या मध्यापर्यंत असतो. तसा असायला हवा, असेही ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ डॉ. श्री. द. महाजन यांनी सांगितलेले आहे.
वनस्पती संशोधक डॉ. मंदार दातार यांनीदेखील आपल्या ‘वानसवाटा’ या पुस्तकात हेच नमूद केले आहे की, फेब्रुवारीपासून वसंतऋतू मानायला हवा. कवी कालिदास यांनी ‘ऋतूसंहार’मध्ये पळस-पांगारे आणि सावरींचे वर्णन केले आहे. त्यातील एका श्लोकाचा स्वैर अनुवाद ‘वानसवाटा’मध्ये दिला आहे.
कोकीळ कंठी हर्षमधुर रव, पलाश दावी वसंतवैभव
पांगाऱ्याच्या लाख मशाली, रक्तवर्ण पुष्पांनी लाली
वसंत शोभा अशी असावी, फुलाफुलातून शोधीत जावी.
वसंतात फुलांचं फुलणं हे हळदीकुंकवासारखं आहे. विविध रंगांची फुले या काळात फुलतात. वसंत ऋतू हा १६ फेब्रुवारी ते १५ एप्रिल दरम्यान मानायला हवा, असे प्रा. महाजन सर यांनी सांगितलेले आहे.
पक्ष्यांचे करा निरीक्षण
आज १४ फेब्रुवारी असल्याने प्रेमाचा दिन समजला जातो. प्रेम म्हणजे केवळ माणसांचे नसते, तर ते निसर्गातही दिसून येते. पक्ष्यांमधील लाडीगोडी निरीक्षणातून आपल्या समजून येते. हीच लाडीगोडी बिबवेवाडी येथे राहणाऱ्या मेधा चांदोरकर यांनी अनुभवली आहे. त्यांनी अनेक पक्ष्यांच्या जोडप्यांचे निरीक्षण केले असून, त्यांची छायाचित्रे कॅमेऱ्यात कैद केली आहेत.