- अजित घस्ते
पुणे : तो सुस्वरूप, सुशिक्षित, पण अंध आणि ती लोभस आणि डोळसही. त्यांचे प्रेम यशस्वी होईल का? असाच अनेकांचा प्रश्न. एका अंध व्यक्तीची डोळस प्रेम कहाणी असलेल्या या दाम्पत्याच्या प्रेम वेलीवर गोंडस मुलगी झाली आणि त्यांच्या जीवनाला नवी ऊर्जा मिळावी. राहुल देशमुख या अंध तरुणाची ही कहाणी. मुलीच्या घरच्यांचा विरोध असताना त्यांचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले आणि त्यांना दिव्यश्री नावाची गोंडस फूल फुलले.
महाविद्यालयात असतानाच त्याच्या जीवनात देवता नावाची डोळस, सुंदर परी मैत्रीण म्हणून आली. आपली जवळीक इतरांना कळू नये यासाठी दोघेही पुरेपूर काळजी घेत होते. या प्रेमीयुगुलांच्या भेटीगाठी कॉलेज सुरू व्हायच्या आधी म्हणजेच सकाळी सहा-सव्वासहाच्या सुमारास होत असत. व्हॅलेंटाइन डे देखील हे दोघं इतर कुणाला कळू नये म्हणून व्हॅलेंटाइन डेच्या एक दिवस आधी साजरा करत असत.
राहुलच्या प्रगतीत अंधत्वाला अडथळा आणताच आला नाही. तो बारावीत पुणे बोर्डत तेरावा, बीएला पुणे विद्यापीठात चौथा, तर एमएला समाजशास्त्र विषयात पुणे विद्यापीठात पहिला, एमए राज्यशास्त्र विषयात पुणे विद्यापीठात पाचवा, याशिवाय त्याने बीएड, एमएसडब्ल्यूचेही शिक्षण घेतलेले. त्याची ही शैक्षणिक प्रगती डोळसांनाही लाजवणारी ठरली.
राहुल आणि देवताचे नाते अधिकच फुलत गेले. इतके की, दोघांनीही एकमेकाचे जीवन साथी होण्याचे ठरवले. देवताने एमबीए फायनान्सचे शिक्षण पूर्ण करून सहायक व्यवस्थापक म्हणून काम मिळविले, तर राहुल बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी म्हणून काम करतोय. त्याने नेत्रहीन व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड (NAWPC) ही नारायण पेठ येथे संस्था सुरू केली आहे.
बँकेतील कामामुळे हे काम कोण करणार असा प्रश्न पडला असतानाच देवताने स्वतःची नोकरी सोडत स्वतःकडे ती जबाबदारी घेत मुलीचा सांभाळ करीत आहे.
आठ महिन्यांची आमची ''दिव्यश्री'' स्वकर्तृत्वाच्या बळावर पुढे जाईल. तिच्या आई-वडिलांच्या दोन पावलं पुढे जाऊन त्यांच्यापेक्षाही मोठं काम तिने करावं, आपल्या आवडीच्या क्षेत्रात स्वतःचं एक आगळं-वेगळं स्थान निर्माण करावं. आम्ही दिलेला सामाजिक कार्याचा वारसा ती जपेल आणि समाजाच्या, देशाच्या विकासासाठी काम करेल. स्वतःची स्वप्नं पूर्ण करून ती स्वतःचं एक असामान्य असं कर्तृत्व सिद्ध करेल असे वाटते.
- राहुल आणि देविका देशमुख