नम्रता फडणीस पुणे : अनिल यार्दी आणि आसावरी कुलकर्णी हे दोघेही ज्येष्ठ नागरिक. अनिल हे व्यावसायिक, तर आसावरी या ‘एलआयसी’तून निवृत्त झालेल्या. ‘लिव्ह इन रिलेशन मंडळा’च्या एका सहलीदरम्यान त्यांची एकमेकांशी ओळख झाली आणि त्यानंतर ते एकमेकांना नियमित भेटू लागले. एकमेकांचा स्वभाव त्यांना आवडला. दोघांच्या मुलींनी मान्यता दिल्यानंतर त्यांनी ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. गेल्या सात वर्षांपासून दोघे आनंदाने ‘लिव्ह इन’मध्ये राहात आहेत. हे झाले एक प्रातिनिधिक उदाहरण... ! आज पुण्यातील काही ज्येष्ठांना ‘लिव्ह इन’ हा ‘प्रेमा’चा नवा मार्ग सापडलाय. जीवनसाथीच्या अकाली ‘एक्झिट’नंतर त्यांनी आयुष्याची नवी इनिंग सुरू केली. पुण्यात सध्या ६८ ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असून, अनेकांनी लग्नगाठदेखील बांधली आहे. तरुणाईबरोबरच ‘लिव्ह इन’मध्ये राहणारी ही ज्येष्ठ जोडपीदेखील प्रेमाचा दिवस साजरा करणार आहेत.
सुरुवातीला आम्ही ज्येष्ठांना जोडीदार कशासाठी हवा आहे, हे जाणून घेतो. ज्येष्ठ म्हटले की त्यांच्यात रिजीडनेस खूप आलेला असतो, किंवा महिला भूतकाळात रमत असतात. पुरुषांकडे पैसा कितीही असला तरी खर्च हाेऊ न देण्याची चिवट वृत्ती असते. त्यामुळे पुढे समस्या वाढू शकतात. याबाबत त्यांचे समुपदेशन केले जाते. आमच्या मंडळाचे एक सदस्य हे सांगली इंजिनिअरिंग कॉलेजचे माजी प्राचार्य. ते भिन्न जातीचे. ती पक्की शाकाहारी आणि ते आहेत मांसाहारी. पण, त्यांची पक्की जोडी जमली आहे. याप्रकारे गेल्या अकरा वर्षांत ६८ जोड्या ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहत आहेत. त्यातील ७० टक्के ज्येष्ठांनी लग्न केले आहे.- माधव दामले, संस्थापक, हॅपी सिनिअर्स मंडळ
उतारवयात खऱ्या अर्थानं गरज असताना अचानक कुणीतरी एकाला सोडून जगाचा निरोप घेते. त्यानंतर मग दुसऱ्याला जाणवू लागतो एकटेपणा. ज्येष्ठ नागरिकांची हीच गरज लक्षात घेऊन पुण्यात २०१२ साली ज्येष्ठ नागरिक ‘लिव्ह इन मंडळा’ची स्थापना झाली. सुरुवातीला नावाला विरोध झाला. त्यामुळे नाव बदलून ‘हॅपी सिनिअर्स’ असे करण्यात आले.
हे बंध प्रेमाचे... नात्यात गुंफलेले...
सुखाच्या सरींत आणि दु:खाच्या झळांतही सोबत कायम राहणं म्हणजे प्रेम असतं... आयुष्याच्या संध्याकाळी एकमेकांच्या साथीत सुख-दु:खाची शिदोरी शेअर करत असलेलं हे अकोल्यातील वृद्ध जोडपं पाहिलं की अशा खऱ्या प्रेमाची साक्ष पटते. (छाया : प्रवीण ठाकरे)