पुणे : १९६५ च्या सुमारास मुंबईत शिक्षण घेऊन पुण्यात आल्यावर मोटवाणी रुग्णालयात काम सुरू केले. त्यावेळी मी लहान नर्सिंग होम सुरू केले होते. त्याची जबाबदारी माझी पत्नी अनुराधावर होती. तर माझा भाऊ मदन संचेती याने नर्सिंग होमच्या व्यवस्थापनात मोलाचे योगदान दिले. त्यांचे कार्य कायम लक्षात राहिल असेच आहे, अशा भावना व्यक्त करत संचेती रुग्णालयाचे संचालक कांतीलाल संचेती यांनी आदरांजली व्यक्त केली.
नर्सिंग होममधील मनुष्यबळ, वापरल्या जाणाऱ्या औषधांची यादी करणे, औषधांच्या वापरासाठी परवाना मिळवणे, शस्त्रक्रिया विभाग आणि त्यातील साहित्य सज्ज ठेवणे, सुरक्षेची काळजी घेणे ही सर्व महत्त्वाची कामे मदन संचेती यांनी सहजतेने केली. त्याचप्रमाणे मनुष्यबळ सांभाळण्याचे अतिमहत्त्वाचे कार्य त्याने केले. नर्सिंग होममधील साहित्य, एक्स रे मशीनची दुरुस्ती, शस्त्रक्रिया विभागातील मनुष्यबळ निश्चित करणे अशी कठीण कार्य त्यांनी केली. त्यामुळेच रुग्णालयाच्या व्यवस्थापनात त्यांचे मोलाचे योगदान होते.
रात्रीच्या वेळी आलेल्या रुग्णांवरही योग्य उपचार व्हावेत, असा त्यांचा प्रयत्न होता. माझी पत्नी नर्स असल्याने तिनेही रुग्णांच्या उपचारांची काळजी घेतली. त्यानंतर आम्ही ठुबे पार्क येथे नर्सिंग होम सुरू केले. त्याचठिकाणी आता संचेती रुग्णालयाची इमारत उभी आहे. ठुबे पार्कमधील रुग्णालयाचा विस्तार करताना बांधकामाची संरचना मी निश्चित केली. तर इतर व्यवस्थापन मदन याने पाहिले. संचेतीच्या प्रत्येक विभागात मदन संचेती यांचे मोलाचे योगदान होते, असेही संचेती म्हणाले.
फोटो - मदन संचेती
-------------------------------------------