वंदना चव्हाण : दत्तमंदिराच्या १२३ व्या स्थापनादिनानिमित्त सन्मान सोहळा
पुणे : मागील दीड वर्षात संपूर्ण जग लॉक झाले. प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये होता. अनेकांना कोविडचा प्रादुर्भावही झाला. या काळात सामाजिक संस्थांनी केलेले काम मोठे आहे. सामाजिक संस्थांकडून समाजसंघटन व समाजाला योग्य दिशा देण्याचे मोलाचे कार्य घडले. त्यात युवतींचा मोठा सहभाग कौतुकास्पद असल्याचे मत खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.
बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमंदिराच्या १२३ व्या स्थापनादिनानिमित्त समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या युवतींचा सन्मान सोहळा मंदिरासमोरील दत्तभवनच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. या वेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रुकारी, कार्यकारी विश्वस्त डॉ. पराग काळकर, खजिनदार राजू बलकवडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उपप्रमुख अॅड. रजनी उकरंडे, विश्वस्त युवराज गाडवे, अॅड. शिवराज कदम जहागिरदार, अॅड.प्रताप परदेशी आदी उपस्थित होते.
स्वरूपवर्धिनी संस्थेच्या मनीषा पाठक, किरण भट्टड, मेघा नगरे, वैशाली रायरीकर, शिल्पा पोफळे, ऋतुजा नराळ, निकिता खताळ, पायल जिरेसाळ या सहा जणींनी कोविड काळात वैकुंठ स्मशानभूमी येथे कोविडमुळे मृत पावलेल्या नागरिकांचे अंत्यसंस्कार केले, अशा कोविडयोद्धा भगिनींचा महावस्त्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय टेनिसपटू राधिका महाजन हिला ट्रस्ट तर्फे २१ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. अॅड. रजनी उकरंडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पराग काळकर यांनी आभार मानले.