पंधरवड्यापूर्वी कात्रज घाट परिसरात मोठी आग लागली होती. ज्या भागात आग भडकली होती. ते क्षेत्र पीएमआरडीएच्या अखत्यारीत होते. पुणे शहरालगत टेकड्या आहेत. टेकड्यांवर आग लागण्याच्या घटना घडतात. बऱ्याचदा मानवी चुकांमुळे आग लागते. आगीत अनेक दुर्मिळ प्रजातीच्या वनस्पती तसेच वृक्षांना झळ पोहोचते. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी विविध यंत्रणांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. या विचाराने वनविभागाकडून वनवणवा परिषदेचे आयोजन केले असल्याचे राहुल पाटील यांनी सांगितले.
शहरी भागातील टेकड्यांवर आग लागल्यास टेकड्यांवर फिरायला येणारे नागरिक वन विभागाला माहिती कळवितात. वनविभागातील एका रक्षकाकडे सातशे ते आठशे हेक्टर क्षेत्र असते. त्याला दोन मदतनीस साहाय्य करतात. टेकडीवर फिरायला येणारे नागरिक वनविभागातील अधिकारी आणि रक्षकांच्या संपर्कात असतात. नियमित फिरायला येणा-या नागरिकांनी समाजमाध्यमावर गट स्थापन केले असून त्याद्वारे आम्हाला माहिती कळविण्यात येते. वनविभागाच्या १९२६ हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून माहिती कळविण्यात येते, असे त्यांनी नमूद केले.
शहरात टेकडीवर येणारे काहीजण जळत्या सिगारेटची थोटके टाकतात. काहीजण वनविभागाच्या जागेपासून काही अंतरावर शेकोटी पेटवतात. वनविभागाच्या जागेत चूल पेटवून जेवण केले जाते. त्यामुळे आगी लागण्याच्या घटना घडतात.
--------------
शेतीमध्ये आग लावू नये
पुणे जिल्ह्यात ऊस लागवडीचे क्षेत्र मोठे आहे. काही भागात ऊस जमिनीला लागूनच वनविभागाच्या जागा असतात. ऊसतोडणी झाल्यानंतर काही शेतकरी उर्वरित राहिलेल्या भागाला आग लावतात. त्यामुळे आग लागण्याच्या घटना घडतात. वन वणव्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी जनजागृती मोहीम राबविणार असून पुणे-सातारा महामार्गावर लवकरच जागोजागी फलक बसविणार आहेत, असे राहुल पाटील यांनी सांगितले.