लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोणतेही राजकारण न आणता पुण्याला देशातील सर्वोत्तम, सुरक्षित शहर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मेट्रोची ही चाचणी होती, डिसेंबरपर्यंत हा मार्ग व्यावसायिक तत्त्वावर सुरू होईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
वनाज ते रामवाडी या मेट्रोमार्गाच्या वनाज ते आनंदनगर या अंतराची चाचणी शुक्रवारी सकाळी ७ वाजता पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, सरकार कोणाचे आहे हे जनता ठरवते. निवडणुकीनंतर विकास महत्वाचा या विचाराने सगळे एकत्र येऊन काम करतो आहोत. पुण्याला काहीही कमी पडू देणार नाही. ७५ हजार कोटी रूपयांचा विकास आराखडा तयार आहे. राजकारण न करता कामे केली जातील.
कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील दृकश्राव्य माध्यमातून सहभागी झाले होते. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्प सुरू झाला. मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठपुरावा ठेवला. अधिकारी, कर्मचारी यांंनी अडथळे दूर करत काम केले.” महापौर मोहोळ म्हणाले की, पुणे ही राज्यातील सर्वात मोठी महापालिका आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मेट्रोचा मोठा वाटा असेल. पुण्याला ही संधी मिळवून देण्यात सर्वांचाच सहभाग आहे.
गोऱ्हे म्हणाल्या, “जमिनीवरून की भुयारी या वादात अडकलेली मेट्रो पुण्यात अखेर सुरु होत आहे. महिलांसाठी मेट्रो ही सर्वाधिक सुरक्षित सेवा आहे. डॉ. दीक्षित यांनी प्रास्तविक केले. पुण्यातील पहिल्या ३ किलोमीटरची चाचणी घेताना अभिमान वाटतो असे ते म्हणाले. मेट्रोच्या कामाचा त्रास सहन करत असल्याबद्दल दीक्षित यांनी पुणेकरांना धन्यवाद दिले. महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, स्थानिक नगरसेवक अर्पणा वरपे, वैशाली माथवड कार्यक्रमाला उपस्थित होते. योगेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी आभार मानले.
चौकट
पुणे मेट्रोची वैशिष्ट्ये
-भारतीय बनावटीचे अँल्यूमिनियम डबे. भारतात प्रथमच पुण्यात वापर.
- ३ कोचमध्ये साडेनऊशेपेक्षा जास्त प्रवासी
- पँनिक बटणची व्यवस्था
-महिलांसाठी स्वतंत्र डबा
- अपंगांसाठी व्हील चेअर
चौकट
पवार म्हणाले...
-कोरोना नियमांचे पालन व्हायलाच हवे. आमच्यावर नाही, पण संयोजकांवर गुन्हे दाखल होतात. दीक्षितांवर गुन्हा दाखल व्हायला नको म्हणून मी काळजी घेतली आहे.
-इतक्या सकाळी कार्यक्रम का असा प्रश्न पुणेकरांना पडेल. मेट्रोच्या कामाचा त्रास पुणेकरांना होतच आहे. आणखी त्रास नको म्हणून सकाळी घेतला.
-स्वारगेट ते कात्रज हा मार्ग भुयारीच करावा लागेल. केंद्र पैसे देणार नाही. महापालिकेने पुढाकार घ्यावा. राज्य सरकार मदत करेल. कात्रज ते निगडी असा मार्ग झाला तर फायदा आहे. निगडी ते पीसीएमसी, वनाज ते चांदणी चौक, स्वारगेट ते हडपसर असे मेट्रोचे जाळे व्हायला हवे.