पुणे : कोथरूडकरांसाठी वरदान ठरू शकणारा वनाज ते चांदणी चौक हा मार्ग राजकीय, तसेच प्रशासकीय पाठिंब्याविना निराधार झाला आहे. फक्त सव्वा किलोमीटरच्या या मार्गासाठी पैसे कोणी खर्च करायचे यावरून सगळे गाडे अडकले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री असताना यासंदर्भात आश्वासन दिले होते. त्यानंतर महामेट्रोने या मार्गाचा प्रकल्प अहवालही तयार केला. मात्र, तो महापालिकेतच पडून आहे.
राजकीय तसेच प्रशासकीय पाठिंब्याविना या प्रस्तावावर पुढे काहीच हालचाल झालेली नाही. हा प्रकल्प अहवाल सादर केला. त्याचवेळी महामेट्रोने सध्या सुरू असलेल्या दोन्ही मेट्रो मार्गांचा पिंपरीपासून पुढे निगडीपर्यंत व स्वारगेटपासून पुढे कात्रजपर्यंत प्रकल्प अहवाल सादर केला होता. विस्तारित मार्गाचे हे दोन्ही अहवाल महापालिकेकडून राज्य सरकारकडे व तिथून आता केंद्र सरकारकडेही गेले आहेत. वनाज ते चांदणी चौक या फक्त सव्वा किलोमीटर मार्गाचा अहवाल मात्र, महापालिकेतच दप्तरी पडून आहे.
या मार्गाचा साधारण खर्च फक्त ३४३ कोटी रुपये आहे. त्यामध्ये वनाजनंतर कोथरूड व चांदणी चौक अशी दोन स्थानके असतील. पुण्यातील मेट्रो प्रकल्पांसंबधी बोलताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विस्तारित मार्गांविषयी लवकरच निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. त्याप्रमाणे निर्णय झाला. मात्र, महापालिकेकडून वनाज ते चांदणी चौक या विस्तारित मार्गाचा प्रकल्प अहवालच पुढे पाठण्यात आला नाही. वास्तविक वनाजपर्यंतचे मेट्रोचे सर्व काम पूर्ण झाले आहे. वनाज स्थानकापासून पुढे महामेट्रोचा मोठा डेपोही तयार झाला आहे.
प्रकल्प अहवाल बासनातच..
वनाजपासून पुढे चांदणी चौकापर्यंत मेट्रोचे काम सुरू करणे ही सोपी गोष्ट आहे. सव्वा किलोमीटरच्या या मार्गाला वेळही फार कमी लागणार आहे. महापालिकेत सलग ५ वर्षे भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता होती. मात्र, यावर त्वरित निर्णय का घेतला गेला नाही ते समजू शकले नाही. महापौरपदही भाजपकडे होते. सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांनीही या मार्गासाठी फारसे प्रयत्न केलेले दिसत नाही. प्रशासनाकडूनही शहरातील महत्त्वाचे काम म्हणून याकडे पाहिले गेले असे दिसत नाही. त्यामुळेच तयार प्रकल्प अहवाल बासनात पडून राहिला आहे.
... म्हणून विषय मागे पडला!
सुरुवातीला महामेट्रोने या सव्वाकिलोमीटरचा खर्च करण्याची तयारी दाखवली होती. मात्र, त्यानंतर महामेट्रोकडे शहरातून अनेक मेट्रो मार्गाची मागणी होऊ लागली. महापालिकेनेही ठराव करून पिंपरीपासून पुढे निगडी व स्वारगेटपासून पुढे कात्रज अशा मार्गांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगितले. त्यात वनाज ते चांदणी चौक या मार्गाचाही समावेश होता. स्वारगेट ते कात्रज हा मार्ग भुयारी करायचा की रस्त्यावरून उन्नत करायचा यातच महामेट्रोचा बराच कालावधी गेला. त्यातच वनाज ते चांदणी चौक हा विषय मागे पडला असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. हा मार्ग प्रत्यक्षात आला तर कोथरूडकरांसाठी तो फायद्याचा ठरणार आहे. ते लक्षात घेऊनच स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे.
पालकमंत्री कोथरूडचे तरीही...
खर्चाच्या नियोजनासाठी राज्य सरकार, तसेच केंद्र सरकारला मध्यस्थ करण्याची गरज आहे. सध्या सुरू असलेल्या कामासाठी जसे नियोजन आहे, तसेच केले तरीही या मार्गाचे काम त्वरित सुरू करता येणे शक्य आहे. पालकमंत्री कोथरूडचे असले तरीही त्यांच्याकडूनसुद्धा याबाबतीत काहीच केले जात नसल्याचे दिसत आहे.