नसरापूर (पुणे) : यावर्षीच्या तीव्र उन्हामुळे तालुक्यातील विशेषत: पुणे - सातारा महामार्गाच्या ग्रामीण भागातील अनेक गावांना पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या शिवगंगा खोऱ्याची मुख्य जीवनदायिनी असलेली शिवगंगा नदी कोरडी पडली असून वन्य प्राण्यांसह, जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. टंचाईमुळे परिसराला दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागणार आहेत. या नदीला अनेक ठिकाणी छोट्या छोट्या बंधाऱ्यांमुळे नदीला पाणी नाही.
शिवगंगेचे उगम स्थान सिंहगडावर असून शिवापूर, खोपी, शिवरे, वरवे, केळवडे, कांजळे, साळवडे हा सधन व बागायती भाग म्हणून ओळखला जातो. शिवगंगेच्या पाण्यामुळे या भागातील शेतकरी केळी, ऊस, गहू पिके , भाजीपाला घेत सुखी समाधानी जीवन जगत आहे. या नदीला भागातील ओढ्या, नाल्यांशिवाय दुसरी कोणतीही मोठी नदी जोडली गेलेली नाही. परंतु उन्हाळ्यात या नदीतून होणारा पाणीपुरवठा थांबला की या भागात कधी नव्हे एवढी पाण्याची टंचाई निर्माण होत असते. घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असते. एप्रिल महिन्यातच मे महिन्यासारखी अगोदरच कडक उन्हामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत नदी कोरडी पडली असून परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे.
अनेक ठिकाणी बोअरवेल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असून जनावरांच्या चाऱ्याच्या समस्येने गंभीर रूप धारण होऊ शकते. आजपर्यंत दुष्काळाचे फारसे चटके या परिसरातील शेतकऱ्यांना बसले नाहीत. परंतु चालू वर्षी मात्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़. जनावरांचा चारा, पाणी तसेच या परिसरातील असणाऱ्या गावांना होणारा जलपुरवठा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या फार गंभीर बनली आहे. पाणी टंचाईमुळे सर्वच बाजूंनी शेतकरी अडचणीत सापडला असून प्रशासनाने या परिसराची पाहणी करून उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक जनतेतून होत आहे.
पाण्याची अशीच परिस्थिती राहिली तर शासनाला या परिसरात चारा छावण्या उभ्या कराव्या लागतील. कारण या परिसरात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात जनावरांचे प्रमाण फार मोठे आहे. प्रशासनाला तातडीने या परिसरातील दुष्काळाचा विचार करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील शेती पूर्णपणे वाढत्या तापमानामुळे करपत असून, अंजीर, पेरू, चिकू , सिताफळ, आंबा, केळी आदी पिकांच्या बागा तसेच ऊस व जनावरांचा चारा पाण्याअभावी जळून जात आहे. शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला असून शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. पाणी टंचाईमुळे सर्वच बाजूंनी शेतकरी अडचणीत सापडला आहे.