पुणे : वनाझ ते शिवाजीनगर धान्य गोदाम (सिव्हिल कोर्ट) या पुणेमेट्रोच्या रिच २ मार्गातील व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेवरील डेक्कन, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, पुणे महापालिका आणि सिव्हिल कोर्ट या स्थानकांची कामे गतीने पूर्ण करण्यात येत आहेत. त्यामुळे लवकरच वनाज ते सिव्हिल कोर्टपर्यंतचा मेट्रो प्रवास सुरू होईल, असा विश्वास महामेट्रोचे संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला.
वनाज ते सिव्हिल कोर्टदरम्यानचे पिलर यापूर्वीच उभे राहिले असून, रेल्वे रूळ टाकण्यासाठीच्या सेग्मेंट व व्हायाडक्टचे कामही पूर्ण झाले आहे. या मार्गिकेवर आता विद्युतीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांची पाहणी नुकतेच डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केली. या स्थानकांसोबतच अन्य कामेही वेगाने पूर्ण करून येत्या काही महिन्यांत वनाज ते सिव्हिल कोर्टपर्यंत मेट्रो धावू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.