पुणे : शेजारील बिअर शॉपी दुकानदाराने बिअर उधार न दिल्याने त्या दुकानाची तोडफोड करतानाच शेजारील मेडिकल दुकानावर दरोडा टाकून गल्ल्यातील रोकड जबरदस्तीने चोरुन नेण्याचा प्रकार काळेपडळ येथे घडला.
याबाबत सुरज सुतार (वय २२, रा. काळेपडळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतीक ऊर्फ नन्या नवनाथ शेंडे (वय १८, रा. काळेपडळ हडपसर) याला अटक करण्यात आली असून, त्याच्यासह चौघांवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तीन विधीसंघर्षीत मुलांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुतार हे त्यांच्या श्री मेडीकल नावाच्या औषधाच्या दुकानात काम करत होते. दरम्यान आरोपी बिअर खरेदी करण्यासाठी शेजारी असलेल्या एस. के. बिअर शॉपी येथे आले होते. त्यांनी शॉपीच्या मॅनेजरला उधारीवर बिअर मागितली असता, त्यांनी नकार दिला. त्यावेळी आरोपी प्रतिक उर्फ नन्या याने शिवीगाळ करुन त्याने व त्याच्या साथीदारांनी हातातील दांडके काचेवर मारून तोडफोड केली. तसेच लोखंडी कोयत्याने बीअर बॉटलच्या फ्रिज, काऊंटरची तोडफोड केली.
दरम्यान हा सर्व प्रकार सुरू असताना, फिर्यादीने दुकान अर्धे बंद करून बाहेर थांबले होते. त्यावेळी आरोपींनी तु काय इथे उभा राहून तमाशा बघतोय काय असे म्हणत मेडिकल दुकानाच्या काउंटरची तोडफोड केली. त्यानंतर गल्ल्यात हात घालून ३ हजार ८०० रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. फिर्यादीने आरोपींना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना उलट्या कोयत्याने मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी परिसरातील सलून व चिकनच्या दुकानात देखील तोडफोड करत आम्ही इथले दादा आहोत, आमच्या नादाला लागू नका. आमच्या नादाला लागले तर तुमचे हात पाय तोडून टाकू अशी धमकी दिली. अचानक झालेल्या तोडफोडीने नागरिकांनी घाबरून आप-आपली दुकाने बंद केली. गुन्हा दाखल होताच तपास करून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर तीन विधीसंघर्षीत मुलांना देखील ताब्यात घेतले आहे. पोलिस उपनिरीक्षक जोगदंड अधिक तपास करीत आहेत.