प्रसाद कानडे
पुणे : देशात येत्या ३ वर्षांत ४०० वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होतील, अशी घोषणा अर्थसंकल्पात केली. मात्र भारतात बहुसंख्य ठिकाणी रेल्वे ताशी ११० किमी वेगाने धावत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे ट्रकची क्षमताच ही ११० किमीचा वेग सहन करू शकेल इतकी आहे. महाराष्ट्रात देखील ११० किमी वेगाचेच ट्रॅक आहेत. ट्रॅकचे मशीनच्या साहाय्याने अपग्रेडेशन केले तरीही गाड्या १३० किमीच्या पुढे धावू शकणार नाहीत.
अद्याप वंदे भारत एक्स्प्रेसच्या कोचचा प्रोटोटाईप तयार झालेला नाही. ऑक्टोबर महिन्यात याचा प्रोटोटाईप त्यानंतर आरडीएसओ (रिसर्च डिझाईन आणि स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) ची मंजुरी घेतल्यावरच याचे उत्पादन सुरू होईल. मेक इन इंडियाअंतर्गतच वंदे भारत म्हणजेच टी १८ रेल्वेचे उत्पादन होणार आहे. ही रेल्वे भारतीय रेल्वेचे रुपडे पालटेल, मात्र ती धावण्यासाठी आवश्यक ती यंत्रणाच रेल्वेने अद्याप तरी उभी केली नाही. त्याचा वेग ताशी किमान १६० ते १८० किमी आहे. मात्र त्या योग्यतेचे ट्रॅकच आपल्याकडे नाहीत. त्यामुळे ती गाडी अन्य मेल, एक्स्प्रेससारख्याच गतीने धावेल. देशात बुलेट ट्रेनसाठी पायघड्या घातल्या जात आहेत. मात्र रेल्वेची गती वाढविण्यासाठी सर्वात आवश्यक असलेल्या ट्रॅककडेच दुर्लक्ष झाले आहे. रेल्वे प्रशासनाने खूप प्रयत्न केले, तरीसुद्धा ताशी १३० किमी वेगाच्या पुढे वंदे भारत एक्स्प्रेस धावणार नाही. त्यामुळे वेगवान रेल्वे प्रवासाचे स्वप्न भंगणार आहे.
मुंबई, पुण्यावरून जाणाऱ्या सुवर्ण चतुष्कोण मार्गाची हीच स्थिती
देशातील सुवर्ण चतुष्कोण पैकी एक असलेला मुंबई-चेन्नई रेल्वे मार्ग हा पुणे स्थानकावरून जातो. हा मार्ग ताशी ११० किमी वेगासाठी फिट केला आहे. त्यामुळे आजही या मार्गावरून रेल्वे गाड्या ताशी ११० किमी वेगाने धावतात. शिवाय मुंबई-कोलकाता व्हाया भुसावळ हा मार्गदेखील ताशी ११० किमी वेगासाठी फिट केला आहे. महाराष्ट्रातील हे दोन महत्त्वाचे मार्ग आहेत. त्यांचीच स्थिती अशी आहे.