पुणे : कोंढव्यातील एनआयबीएम रोडवरील कडनगर येथे उतारावरून वेगाने जाणाऱ्या नवीनच व्हॅनिटी बसचे ब्रेक फेल झाले आणि समोरून आलेल्या सहा वाहनांना उडवले. प्राथमिक माहितीनुसार, यात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला आहे. जवळपास सहाजण जखमी झाले आहेत. ऑर्चिड पॅलेस समोरील उतारावर रविवारी सायंकाळी सव्वासात वाजता हा अपघात झाला. या अपघातात बीएमडब्ल्यूसह तीन मोटार, टेम्पो, रिक्षा आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले.
अधिक माहितीनुसार, दि टाईम ट्रॅव्हल्सची बस ज्योती हॉटेलकडून एनआरबीएम रोडने रविवारी सायंकाळी जात होती. नेहमी या रोडवर खूप वर्दळ असते. सुदैवाने रविवार असल्याने गर्दी कमी होती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ऑर्चिड पॅलेससमोरील उतारावर बसचे ब्रेक फेल झाल्याचे चालक मोठमोठ्याने ओरडून सांगू लागला. तोपर्यंत बसने अगोदर समोरून आलेल्या बीएम डब्ल्यू कारला धडक दिली. पाठोपाठ तीन कारला धडक देत पुढे गेली. रिक्षाला व दुचाकीलाही धडक दिली. तसेच भाजीच्या टेम्पोला धडक दिल्यानंतर ५०० मीटर दूरवर जाऊन ती थांबली.
या घटनेची माहिती मिळताच कोंढवा ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे निरीक्षक संजय मोगले व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात नेले. तेथे एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. यात प्रशांत भानुदास घेमुड (वय ३७, रा. बधेनगर, कोंढवा) आणि एकाचा मृत्यू झाला, तर अन्य सहाजण जखमी झाले आहेत.
नवीन बसचा ब्रेक फेल कसा?या रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण केले होते. अपघात केलेली ही खासगी बस व्हॅनिटी कार म्हणून तयार केली जात होती. तिला नंबरप्लेटही लावण्यात आलेली नसून, नंबर हाताने लिहिलेला होता. अशा नव्या बसचा ब्रेक फेल कसा झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.