पुणे : सोमनाथ गायकवाड हा एप्रिल महिन्यात जामिनावर कारागृहातून बाहेर आला. आंदेकर टोळीत आणि त्याच्यामध्ये धुसफूस सुरूच होती. सोमनाथला भीती होती की, आंदेकर टोळी एकदिवस आपला गेम करणार. त्यामुळे आपल्याला जिवंत राहायचे असेल तर आंदेकर टोळीचा बॅक बोनच ठोकला पाहिजे असे त्याने ठरवले. दीड ते दोन महिन्यांपासून त्याने डाव टाकण्यास सुरुवात केली. अखेर रविवारी रात्री संधी मिळताच सोमनाथच्या पंटरांनी वनराज आंदेकरांचा गेम केला. पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात आंदेकर टोळीचा दबदबा. मात्र, या गुन्हेगारीपासून लांब अशी वनराज आंदेकरांची ओळख. वनराज राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. राष्ट्रवादी पक्षाकडून ते नगरसेवकदेखील झाले होते. मात्र, पूर्ववैमनस्य, कौटुंबिक कलह, संपत्तीवरून वनराज यांच्या खुनाचे प्राथमिक कारण आहे.
वनराज आंदेकर यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कौटुंबिक वादातून खून झाल्याची शक्यता दिसत आहे. मात्र, यामागे टोळी वर्चस्वही असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. यातील एक आरोपी सोमनाथ सयाजी गायकवाड हा आंदेकर टोळीचा प्रतिस्पर्धी आहे. त्याची स्वत:ची टोळी असून, तो मोक्कातून जामिनावर बाहेर पडला आहे. स्वतः सोमनाथ आणि टोळीतील काही सदस्य आंदेकर टोळीच्या रडारवर होते. यामुळे आपल्याला आणि सदस्यांना काही होण्याआधीच आपणच आंदेकर टोळीला धक्का देऊ असा विचार गायकवाड याने केला होता का? याची तपासणी केली जात आहे. पोलिसांनी सध्या सोमनाथ गायकवाडला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
वनराज आंदेकरांच्या खुनात सोमनाथ गायकवाड याने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे पोलिस सांगतात. ऑक्टोबर २०२३ मध्ये निखिल आखाडे (२९) याचा खून झाला, तर अनिकेत दुधभाते हा गंभीर जखमी झाला होता. नाना पेठेत ही घटना घडली होती. आखाडेच्या खुनाचा आंदेकर टोळीवर आरोप होता. पुढे या गुन्ह्यात सूर्यकांत ऊर्फ बंडू अण्णा रोणीजी आंदेकर, कृष्णराज ऊर्फ कृष्णा सूर्यकांत आंदेकर आणि त्यांच्या साथीदारांना अटक झाली. निखिल आखाडे आणि अनिकेत दुधभाते हे दोघे सोमनाथ गायकवाड याचे निकटवर्तीय. आखाडेचा खून सोमनाथच्या जिव्हारी लागला होता, तर अनिकेतवर गंभीर वार झाले होते. तेव्हापासूनच सोमनाथ आखाडेच्या खुनाचा रिप्लाय देण्याच्या तयारीत होता.
आंदेकर टोळीची पोरं सोमनाथला आणि त्याच्या पोरांना शिव्या घालायची. तुमची विकेट फिक्स टाकणार, अशा धमक्या द्यायची. त्यामुळे सोमनाथ चिडून होता. अनिकेतदेखील आपल्यावरील झालेला हल्ला आणि आखाडेच्या खुनाचा बदला घेण्यासाठी योग्य संधीच्या शोधात होता. सोमनाथने नियोजन आखले, तर त्या नियोजनाला मूर्त रूप देण्याचे काम अनिकेतवर सोपवण्यात आले. सुरुवातीला त्यांनी बंडू आंदेकर यांच्यापासून कृष्णा आंदेकर या दोघांचा गेम वाजवण्याचा विचार केला. मात्र, त्या दोघांना संपवून टोळी कमकुवत होणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. सोमनाथ पूर्वी आंदेकर टोळीचा भाग होता. त्याला टोळीचे खाचखळगे माहिती होते.
सोमनाथच्या म्हणण्यानुसार, तो आंदेकर टोळीचा बॅक बोन म्हणून वनराज यांना पाहत होता. टोळीतील सदस्यांना जामीन मिळवून देण्याचे, त्यांना कारागृहातून बाहेर काढण्यापर्यंतचे काम वनराज करत असत. त्यामुळे इतरांना मारून काहीच फायदा नाही असे सोमनाथला वाटले. त्यामुळे त्याने गेम करायचा तर वनराज यांचाच असे ठरवले, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. त्यानुसार मागील एक ते दीड महिन्यापासून सोमनाथने वनराज यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्यासाठी आपली पोरं ठिकठिकाणी पेरली. वनराज यांचा खून झाला, त्यावेळी सोमनाथ आंबेगाव पठार परिसरात होता. त्याला वनराजचा खून आपल्या पोरांनी केल्याची माहिती मिळताच त्याने शहरातून पळ काढला. सोमनाथला टेंभुर्णी येथून गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सोमनाथ गायकवाड आणि सूरज ठोंबरे हे आंदेकर टोळीचे प्रतिस्पर्धी एका मोक्कामध्ये कारागृहात होते. सूरज ठोंबरे संबंधित प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याने त्याला जामीन मिळाला नाही. मात्र, सोमनाथला जामीन मिळाला. जामीन देताना त्याला शहर परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली होती. पोलिसांनी सध्या सोमनाथला ताब्यात घेतले असले तरी तो आपला काही संबंध नसल्याचे सांगत आहे. मात्र, वनराजचा खून होणार असल्याची कल्पना असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. पोलिसांनी सोमवारी (दि. २) या खूनप्रकरणी प्रकाश कोमकर, सोमनाथ गायकवाड आणि संजीवनी जयंत कोमकर यांना अटक केली असून, आज त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.