पुणे : रस्त्याच्या कडेने जाताना अस्वच्छ भिंतींची शोभा वाढवण्याच्या दृष्टीने काय करता येईल, असा नेहमी प्रश्न पडायचा. भिंतींवर चित्रे काढून यात पुणेकरांना सहभागी करून घेण्याची कल्पना सुचली. आम्ही सात तरुणांनी ‘वानरसेना’ या नावाने एक उपक्रम हाती घेतला. सर्वप्रथम पुणे रेल्वे स्थानकाची भिंत सुशोभित करण्याचे काम हाती घेतले. कधीही कुंचला न घेतलेल्या हातांनीदेखील उत्तम चित्रकलेचा नमुना भिंतींवर उतरवला, अशा आठवणी प्रसाद भारद्वाज आणि स्वप्निल कुमावत यांनी संस्थेचा प्रवास उलगडल्या.सूत्रधार संस्थेच्या वतीने टॉक शो कार्यक्रमाचे आयोजन सेनापती बापट रस्ता येथील कलाछाया सभागृहात करण्यात आले. या वेळी आयोजक मधुरा आफळे, तोषल गांधी, नताशा पूनावाला यांनी रामायणातील कथा चित्रांच्या माध्यमातून कशा प्रकारे सांगितल्या जातात, याचे सादरीकरण केले. कॅनव्हासवर चित्र काढून रंगविण्याच्या उपक्रमात उपस्थितांनी देखील उत्साहाने सहभाग घेतला.स्वप्निल कुमावत म्हणाले, ‘रस्त्यावरील भिंती दिवसेंदिवस खराब होत चालल्या आहेत. त्यामुळे सामान्यांचा सहभाग असेल असा उपक्रम करणे गरजेचे होते. म्हणूनच सामान्यांना या उपक्रमात सहभागी केले आणि त्यांना जे वाटते ते भिंतीवर काढायला सांगितले. अशाप्रकारे शहरातील रस्ते, शाळांमधील भिंतींपासून ते थेट येरवडा कारागृहात कैद्यांना आणि पोलिसांना देखील एकत्र आणून भिंती रंगविल्याने त्यादेखील आकर्षक वाटू लागल्या, असेही ते म्हणाले.
‘वानरसेने’चा उलगडला कलाप्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 3:37 AM