पुणे : थुंक्यांच्या पिंकांनी लालीलाल झालेल्या किंवा जाहिरातींच्या पत्रकांची ठिगळे लागलेल्या भिंती पाहण्याची सवय लागलीय. देवादिकांच्या तसबिरी लावण्याची उपाययोजना करण्याची वेळ येते. पण पुण्यातील आयटीतील काही तरुणांच्या कल्पनेतून रंगविलेल्या भिंती आता जिवंत झाल्या आहेत. आयटीमध्ये काम करणारा स्वप्निल कुमावत आणि त्याच्या आठ मित्र- मैत्रिणींनी एकत्र येऊन शहराच्या विविध भागातील भिंतींवर या मानवी भावभावना रेखाटल्या आहेत. स्वप्निल म्हणाला, ‘‘आम्ही सर्वजण आयटी कंपन्यामध्ये काम करतो. सामान्यांशी जोडले जातानाच कलेलाही व्यासपीठ मिळावे यासाठी आम्ही वानरसेना नावाच्या ग्रुपची सुरूवात केली. यामध्ये आयटीमध्ये काम करणारे अनेक तरुण असून हे हौशी कलाकार सुटीच्या दिवशी एकत्र येऊन आपली कला जोपासतात. वानरसेनेच्या वतीने भिंती रंगविण्याच्या कलेची सुरूवात खराडी येथील एका सोसायटीच्या भिंत रंगविण्यापासून झाली. पहिल्याच प्रयत्नांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. लहानांच्या चेहऱ्यावर हसूही उमटले; कारण ही भिंत रंगविण्यासाठी त्या चिमुकल्यांचादेखील तितकाच सहभाग होता. त्यानंतर वाघोलीतील एका अनाथ आश्रमाच्या आवारातील भिंती रंगविल्या. (प्रतिनिधी)
वानरसेनेच्या कलेतून भिंती झाल्या जिवंत
By admin | Published: January 13, 2017 3:45 AM