लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जागतिक पर्यटन दिनानिमित्त (दि. २७) राज्याच्या पर्यटन संचालनालयाने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात स्थानिक स्थलदर्शनाबरोबरच पर्यटन का?, कशासाठी?, कसे?, कुठे? अशा स्वरूपाच्या माहितीदर्शक कार्यक्रमांचा समावेश आहे. त्यात पर्यटकांबरोबर स्थानिक व्यावसायिकांच्या गरजांचाही विचार करण्यात आला आहे.
संयुक्त राष्ट्र पर्यटन संस्था (युन्टो) या आंतरराष्ट्रीय पर्यटन संस्थेने या वर्षी सर्वसमावेशक वाढीसाठी पर्यटन अशा बोधवाक्याची निवड केली आहे. त्याला अनुसरून या कार्यक्रमांची रचना करण्यात आली असून, त्याशिवाय प्रत्येक विभागाला त्यांची स्थानिक आवड, गरज लक्षात घेऊन कार्यक्रम करण्याची मोकळीक देण्यात आली आहे. पर्यटनाचा विचार करताना स्थानिक प्रदेशाच्या विकासाचाही विचार करणे यात अपेक्षित आहे.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने हा पर्यटन दिन साजरा होत आहे. पुणे विभागातील पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तसेच कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या विभागांनाही आपापल्या कार्यक्षेत्रातील शहरे, ऐतिहासिक स्थळे यांचा विचार करून तेथे कार्यक्रम आयोजित केले आहेत. हेरिटेज वॉक, नेचर वॉक, उपेक्षित वंचित घटकांना परिसरातील सहली, कृषी पर्यटन, साहसी पर्यटन त्याशिवाय पर्यटनाशी संबंधित छायाचित्र, निबंध, चित्रकला स्पर्धा, अशा उपक्रमांचे आयोजन राज्यभरात करण्यात आले आहे. त्यासाठी पर्यटनाशी संबंधित स्थानिक व्यावसायिक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे साह्य घेण्याबाबतच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत.
कोट ----
पर्यटन हा शहरांच्या, सर्वसामान्य समाजाच्या विकासाचा भाग व्हावा असा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांना कार्यक्रम घेण्याविषयी कळवण्यात आले आहे. लोकसहभाग वाढावा, सर्वसामान्यांमध्ये पर्यटनाविषयी उत्सुकता निर्माण व्हावी असा उद्देश आहे.
- सुप्रिया करमरकर, उपसंचालक, पर्यटन संचालनालय, पुणे विभाग