पुणे : मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणुकीचा दिमाखदार सोहळा लक्ष्मी रस्त्यावर पहायला मिळत असताना सायंकाळी ४ वाजता वरुणराजाने देखील बरसात करून बाप्पाच्या निरोपाला हजेरी लावली. भरपावसातही भाविकांनी मिरवणुकीचा आनंद लूटला. अनेकांनी छत्र्या आणल्या होत्या तर काही जणांनी पावसाचा आनंद घेत ढोलताशावर ठेका धरला. पावसातही गणपती बाप्पाचा गजर सुरुच होता.
पावसाने परतीचा प्रवास सुरू केला असून, पुणे शहरात आज दुपारपर्यंत आकाश निरभ्र होते. दुपारी प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यामुळे सर्व कार्यकर्ते आणि भाविक घामाने ओलेचिंब झाले होते. त्यातच सायंकाळी ४ वाजता पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काहीसा दिलासा पुणेकरांना मिळाला.
विसर्जन मिरवणूकीत पाऊस आल्याने भाविकांना आणि कार्यकर्त्यांना अधिकच उत्साह आला. जलधारांमध्ये ढोलताशा आवाज प्रत्येकाच्या कानी घुमत होता. वरूणराजाच्या साक्षीने गणरायाला निरोप देण्यात येत होता. सकाळपासून मिरवणूक पहायला आलेली गर्दी पाऊस आला तरी कमी झाली नाही.
येत्या दोन तीन दिवसांमध्ये पुणे शहरात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यंदा मॉन्सून उशीरा आला आणि आता परतीचा प्रवास देखील उशीराच सुरू झाला आहे. राजस्थानमधून पाऊस परतीला लागला आहे. महाराष्ट्रातील तारीख १० ऑक्टोबर देण्यात आलेली आहे. परंतु, त्यापूर्वीच महाराष्ट्रातून तो परत जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्राभर मॉन्सून सक्रिय आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. येत्या दोन तीन दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.