पुणे : गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात सुरू असून आकाश निरभ्र असल्याने प्रचंड उकाडा जाणवत आहे. या उकाड्यात देखील गणेशभक्तांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. दुपारनंतर वरूणराजा देखील या मिरवणुकीला हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून माॅन्सून सक्रिय झालेला असून राज्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे. पावसाचे विघ्न मिरवणूकीवर येऊ नये म्हणून सर्व मंडळांनी लवकर मिरवणूक संपविण्यासाठी लगबग सुरू केली आहे. मानाचे गणपती सध्या टिळक पुतळ्याजवळ आले असून तीन लक्ष्मी रस्त्यावर लागले आहेत. दुपारी २ च्या आत कदाचित पाचही मानाचे गणपती लक्ष्मी रस्त्यावर असतील.
आज सकाळी पासून ढगाळ वातावरण होते. परंतु ११ नंतर मात्र आकाश निरभ्र झाले असून लख्ख उन्ह पडले आहे. मिरवणुकीतील कार्यकर्ते घामाने चिंब झाले आहेत. ढोलताशावर त्यांचा उत्साह पहायला मिळत आहे.आज दुपारनंतर पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे मिरवणूकीमध्ये वरूणराजा आल्यानंतर सर्वांचीच धावपळ होणार आहे. सध्याच्या प्रचंड उकाड्यात मिरवणूक हळूहळू पुढे सरकत आहे.