पुणे : सध्या राज्यामध्ये उकाडा वाढत असताना दुसरीकडे गारपीट आणि पावसाची शक्यता ही हवामान खात्याने वर्तविण्यात आली आहे. विदर्भामधील वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ याठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह, गारपीट होईल आणि हलक्या सरी कोसळतील, असा इशारा दिला आहे. मराठवाड्यातही पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण व दमट हवेमुळे राज्यात विचित्र हवामान तयार होत आहे. त्यामुळे एकीकडे उकाडा जाणवत असताना दुसरीकडे पावसाचा इशाराही देण्यात येत आहे. ७ ते ११ एप्रिल दरम्यान विदर्भातील अनेक भागात गारपीट आणि पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. ७ एप्रिल रोजी म्हणजे आज चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या ठिकाणी सायंकाळी हलक्या सरी येतील आणि नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला या ठिकाणी ९ एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता आहे, असा अंदाज ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी वर्तविला आहे.
दरम्यान, पुण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने उकाड्यापासून जरासा दिलासा मिळाला. पण दुपारी मात्र चांगली उष्णता जाणवत होती. रविवार-सोमवारी पुण्यात हवामान कोरडे राहणार असून, मंगळवारी म्हणजे गुढीपाडव्याला वरूणराजाची हजेरी लागेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.