पुणे : यंदा एल निनोचा प्रभाव कमी कमी होत असून, तो जूनच्या अगोदरच संपुष्टात येणार आहे. दुसरीकडे ला निनोचा प्रभाव वाढत असून, तो जूनपासून सक्रिय होईल. त्यामुळे यंदा मॉन्सून लवकर येण्याची शक्यता असून, पाऊसही चांगला होईल, असा अंदाज अमेरिकेतील नॅशनल ओशनिक ॲन्ड एटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि स्कायमेट संस्थेने दिला आहे.
गेल्या वर्षी राज्यात चांगला पाऊस झाला नाही. तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील कमीच पाऊस झाला. त्यामुळे यंदा उन्हाळा अधिक तापदायक ठरत असून, पाणीटंचाई देखील जाणवत आहे. त्यामुळे नागरिक आता पावसाची वाट पाहत आहेत. शेतकरी आणि नागरिकांसाठी यंदा आनंदवार्ता असून, वरूणराजा चांगला बरसणार आहे.
यंंदा मॉन्सून वेळेअगोदरच दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, इंडियन ओशन डायपोल आणि ला निना एकाच वेळी सक्रिय झाल्याने या वर्षात मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज दिला आहे. स्कायमेट या संस्थेने देखील ला निनोमुळे चांगला पाऊस होईल, असे सांगितले आहे.
ला निना इफेक्ट एक आवर्ती हवामानाची घटना आहे. जी मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरात सरासरीपेक्षा अधिक थंड समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान आणि हिंदी महासागर डिपोल, तसेच हिंदी महासागरात समुद्राच्या पृष्ठ भागावरील तापमान बदलामुळे घडते. या परस्परसंबंधित गतीशीलतेचा नैऋत्य मान्सूनवर लक्षणीय परिणाम होईल असा अंदाज आहे. सध्या एल निनोचे रूपांतर वेगाने ला निनामध्ये होत आहे. ते जून-ऑगस्टपर्यंत संपूर्णपणे सक्रिय होईल. त्या काळात मॉन्सूनच्या घडामोडी अधिक होत असल्याने पाऊस चांगला होईल, असा अंदाज देण्यात आला आहे.
एल निनो संपुष्टात येणार
एप्रिल ते जून या कालावधीत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्य पातळीवर (न्यूट्रल) येण्याचे संकेत आहेत. तेव्हा एल निनो संपुष्टात येईल. तर ला निनो हा मॉन्सूनच्या सुरवातीपासून तयार होण्याची शक्यता आहे. परिणामी मॉन्सून चांगला बरसेल.
नेमके कारण काय ?
ज्या वर्षी एल निनो सक्रिय असतो, त्यावर्षी चांगला पाऊस होत नाही, असे हवामान विभागाच्या नोंदींचे अनुमान आहे. तर ज्या वेळी ला निनो सक्रिय असतो, तेव्हा मात्र चांगला पाऊस होतो. म्हणून यंदा मॉन्सूनच्या अगोदर ला निनोचा प्रभाव वाढणार आहे.