पुणे : भावजयीच्या निधनानंतरच्या विधींसाठी तात्पुरता जामीन मिळावा असा अर्ज विद्रोही कवी आणि लेखक वरवरा राव यांनी युएपीएच्या (बेकायदेशीर प्रतिबंधक हालचाली) विशेष न्यायालयात केला आहे. राव यांना माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन अटक करण्यात आली आहे. ते सध्या येरवडा कारागृहात आहेत.
राव यांना सोमवारी भावजयीचे निधन झाल्याची माहिती मिळाली. राव यांच्या मोठ्या भावाचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे आता घरात वरवरा राव हे मोठे आहेत. निधनानंतर 9 ते 12 दिवसापर्यंतच्या धार्मिक विधीसाठी घरातील मोठी व्यक्ती उपस्थित राहणे गरजेचे असल्याने त्यांनी विधींसाठी न्यायालयाकडे 29 एप्रिल ते 4 मे दरम्यान तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. अन्यथा एस्कॉटच्या (पोलिस बंदोबस्तात) उपस्थितीत धार्मिक विधीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. त्यासाठी लागणा-या खर्चाची जबाबदारी अॅड. राव हे घेण्यास तयार असल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले आहे.
पेड्डा कर्मा (धार्मिक विधी) मध्ये दहाव्या दिवसाला महत्व असून त्याला दशा दिन कर्म असे संबोधले जाते. या विधींसाठी अॅड. राहुल देशमुख आणि अॅड. पार्थ शहा यांनी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला आहे. याबाबत तपास अधिकारी आणि जिल्हा सरकारी वकील यांना न्यायालयाने म्हणणे सादर करण्यास सांगितले असून अर्जावरील सुनावणी 25 एप्रिल रोजी होणार आहे