पुणे - नाराज माणूस नेहमीच लहान-सहान आणि जुन्या गोष्टींमध्ये आपला आनंद शोधत असतो. अनेकदा, पैसा-ऐशोआराम आणि सुखसोयीही त्यांस फिक्या वाटू लागतात. आपल्या वडिलोपार्जित वस्तू किंवा जुन्या, बालपणीच्या मित्रांसमेवत रमण्यात त्याला सर्वाधिक आनंद वाटतो. गेल्या काही दिवसांमाणूस मनसेमध्ये नाराज असलेल्या नगरसेवक वसंत मोरेंनीही आपल्या वडिलांच्या सायकलची आठवण शेअर केली आहे. या सायकलची सर आज माझ्याजवळ असलेल्या ऑडी, बीएमडब्लू यांसारख्या महागड्या कारलाही नाही, असे भावनिक शब्द त्यांनी वर्णन केले आहेत.
राज ठाकरेंचे (Raj Thackeray) कट्टर समर्थक आणि मनसेचे नेते वसंत मोरे (MNS Vasant More) यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवल्यावर साईनाथ बाबर यांची शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर वसंत मोरे पुण्यातील पक्षाच्या काही कार्यकर्त्यांवर नाराज असल्याचे दिसून आले होते. मला पक्षातून डावललं जातंय. अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती. तसेच मी शेवटपर्यंत राजमार्गावरच राहणार, असं स्पष्टीकरण वसंत मोरे यांनी दिलं आहे. मात्र, वसंत मोरे आजही नाराज असल्याचे दिसून येतात. त्यामुळेच, सध्या ते जुन्या आठवणीत रममाण झाल्याचे दिसून आले.
वसंत मोरेंनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये, त्यांच्या वडिलांनी वापरलेली 30 वर्षांपूर्वीची सायकल दिसून येते. या सायकलीला एक कुऱ्हाडदेखील अडकवलेली आहे. या फोटोसह त्यांनी जुन्या आठवणी शब्दात वर्णन केल्या आहेत.
दरम्यान, वसंत मोरेंच्या पोस्टमधून त्यांना आज वडिलांची आठवण झाल्याचे दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून ते मनसेत, काही पदाधिकाऱ्यावर नाराज आहेत. अशा या नाराजीच्या क्षणावेळी सर्वात मोठा आधार असतो तो आपल्या आठवणींचा, आपल्या भूतकाळाचा आणि आपल्या तत्कालीन परिस्थितीचा. वसंत मोरेही त्याच आठवणीत रममाण होऊन आनंद शोधत असल्याचे या ट्विटरर पोस्टवरुन दिसून येते.