पुणे - मनसेप्रमुखराज ठाकरे मंगळवारपासून पुण्यात असून मनसेच्या तीन कार्यालयांची उद्घाटनं त्यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चाही केली. खडकवासला मतदारसंघातील धायरी येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना राज ठाकरेंच्या पाठिशी मनसेचे नगरसेवक वसंत मोरे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे यावेळी दोघांमधील नेता-कार्यकर्ता हा भावही पाहायला मिळाला. वसंत मोरे आणि राज ठाकरेंच्या या भेटीची सध्या पुण्यात चांगलीच चर्चा होत आहे. कारण, काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी एका पत्रातून वसंत मोरेंवरच निशाणा साधला होता, असेही बोलले जात आहे.
राज ठाकरे मंगळवार आणि बुधवार या दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात सोमवारी त्यांनी पुण्यातील तीन जनसंपर्क कार्यालयांची उद्घटने केली. मात्र, धायरी येथील कार्यलय उद्घाटन सोहळा माध्यमांत चर्चेत राहिला. कारण, खडकवासला मतदारसंघाची जबाबदारी ज्या वसंत मोरेंवर आहे, ते मोरे राज ठाकरेंच्या खुर्चीला धरुनच उभे दिसले.
राज ठाकरे उद्घाटन करून कार्यालयात आले. त्यावेळेस खुर्चीवर बसताना त्यांनी मिश्कील प्रश्न विचारला, "खुर्ची व्यवस्थित आहे ना?, मागे कोणाची तरी खुर्ची तुटली होती." राज ठाकरेंच्या या प्रश्नावर वसंत मोरेंनी लगेचच उत्तर दिले. "चंद्रकांत पाटील यांची तुटली होती." तसेच, "साहेब तुम्ही बसा, मी मागे आहेच...", असं मोरेंनी राज ठाकरेंना म्हटलं. राज ठाकरेंनी पाठीमागे वळून पाहात वसंत मोरेंवर कटाक्ष टाकला. या प्रसंगाची आता पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा तर होणारच.
मला साधू करुनच सोडणार...
राज ठाकरे उद्घाटन करून कार्यालयात आले, त्यावेळेस भगवी शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी, मनसेचे नेते बाबू वागस्कर, किशोर शिंदे, वसंत मोरे आदी नेते उपस्थित होते. भगवी शाल देऊन सत्कार करताच राज ठाकरे यांनी एक मिश्किल टिप्पणी केली. "तुम्ही बहुतेक मला आता साधू करूनच सोडणार..." असे राज यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ पाहायला मिळाला.
आज सायंकाळी व्याख्यान
पुण्यात पदाधिकाऱ्यांशी बोलताना, उद्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील, असं राज ठाकरेंनी म्हटलं. त्यानुसार, सहजीवन व्याख्यानमालेत राज ठाकरे ''नवं काहीतरी''... या विषयावर आज बोलणार आहेत. त्यामुळे ते पक्षाच्या नवनिर्माणाबद्दल काय बोलणार, नेमकी कुठल्या प्रश्नांची उत्तरं देणार, त्यात कुणाला लक्ष्य करणार का की 'इंजिना'च्या पुढील प्रवासाची दिशा सांगणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.