पुणे : महाराष्ट्रात काल राजकीय भूकंप झाल्यानंतर राज्यातील सरकार पडणार कि राहणार याबाबत तर्क - वितर्क लावले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदाचा राजीनामा देणार का? याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुण्यातील मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे हे नेहमीच कुठल्या तरी कारणाने चर्चेत असतात. त्यातच या राजकीय घडामोडीनंतर त्यांनी केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे.
कालच्या राजकीय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे ३५ आमदारांसहित सुरतला गेल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेत फूट पडल्याचे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे. तर एकनाथ शिंदे यांनी आम्ही बाळासाहेबांच्या तत्वावर चालणारे आहोत. हिंदुत्व सोडणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच भाजप आणि शिवसेनेने एकत्र यावे असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना अधिकच वेग प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार याबाबत राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
महाविकास आघाडी सरकार पडणार कि राहणार याबाबत तर्क वितर्कही लावले जात आहेत. त्यातच वसंत मोरे यांनी केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. आग लगी बस्ती में हम हमारी मस्ती मे...! "तुम्ही सरकार पाडा... आम्ही शिंदोळ्या पाडतो..." सगळं ठरवुन चाललंय लय टेन्शन घेवु नका..! असं मोरे पोस्टच्या माध्यमातून म्हणाले आहेत.
आमच्यासोबत ४६ आमदार
सकाळीच एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत सध्या ४० आमदार असल्याचे म्हटले होते. तसेच आणखी १० आमदार येतील असे म्हटले होते. आता दुपारी त्यांनी आपल्याकडे ४६ आमदार आल्याचे म्हटले आहे. म्हणजेच सहा तासांत सहा आमदार वाढले आहेत. शिवसेनेचे दोन आणि अपक्ष तीन असे पाच आमदार सायंकापर्यंत गुवाहाटीला पोहोचण्याची शक्यता आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. हिंदुत्व ही आमची भूमिका आहे. त्याच्याशी कदापीही तडजोड केली जाणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आपल्यासोबत ४६ आमदार आहेत, आणखी काही येत आहेत. आमचे सहकारी पक्षाचे आमदारही यात आहेत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.