Vasant More News: महाविकास आघाडीतील चर्चा बिनसल्याने अखेर वंचित बहुजन आघाडीने आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तसेच महाविकास आघाडीतील जागावाटप आणि बैठका यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर घाणाघाती आरोप केला आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा लढवण्याच्या निर्णयावर ठाम असलेले वसंत मोरे पाठिंबा मिळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून वसंत मोरेप्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊ शकतात, असे सांगितले जात आहे.
वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी यादी जाहीर करताना, मनोज जरांगे पाटील व ओबीसी महासंघाचे प्रकाश शेंडगे यांच्यासोबत चर्चा करून पुढील उमेदवार जाहीर करणार असल्याचे प्रकाश आंबडेकर यांनी स्पष्ट केले. तसेच नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे सांगितले. पहिल्या टप्प्यातील 'वंचित'च्या उमेदवारांना मनोज जरांगे यांचे समर्थन आहे. याबाबत त्यांच्यासोबत चर्चा झाल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. यानंतर आता वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरेंना उमेदवारी मिळणार?
महाविकास आघाडीपासून फारकत घेत वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी यादी जाहीर केली. तसेच उर्वरित उमेदवार ०२ एप्रिलला घोषित केले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आता वसंत मोरे हे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. या भेटीत वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळण्यासाठी प्रयत्नशील असतील, असे म्हटले जात आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर होणार का, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.
सकल मराठा समाजाच्या बैठकीला वसंत मोरेंची उपस्थिती
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उभारलेल्या लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाची बैठक घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पुण्यात झालेल्या बैठकीला वसंत मोरे यांनी उपस्थिती लावली. वसंत मोरे यांनी सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या बैठकीला हजेरी लावताना, पुण्यात खासदार होण्यासाठी सकल मराठा समाज आणि वंचितने सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. तसेच वसंत मोरे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन पाठिंबा मिळण्याबाबत चर्चा करणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि मराठा समाजाकडून वसंत मोरे यांना पाठिंबा मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पुणे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि भाजपाकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. काही झाले तरी निवडणूक लढवणार अशी ठाम भूमिका वसंत मोरे यांनी घेतली आहे. पुणे लोकसभेतून १०० टक्के मीच खासदार होणार असा दावा वसंत मोरे यांनी केला आहे. मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांना महाविकास आघाडीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, महाविकास आघाडीकडून निराशा पदरी पडल्यानंतर पाठिंबा मिळावा, यासाठी वसंत मोरे चांगलीच धावपळ करताना दिसत आहेत. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार का, याबाबत वसंत मोरे यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही.