पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला होता. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आघाडीवर टिकाही केली होती. त्यामुळं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज ठाकरेंनी शनिवारच्या भाषणात राजकीय घडामोडींबरोबर, धार्मिक विषयांना हात घातला. मशीदवरील भोंगे नकोत. अन्यथा त्यांच्यासमोर भोंग्यावर हनुमान चालीसा लावली जाईल. असा इशारा राज ठाकरे यांनी शनिवारी दिला होता.
यावरून महाराष्ट्रात विरोधी पक्षांकडून टीकाही होऊ लागली आहे. तर राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचे धाडस मनसैनिक करू लागले. त्यातच पुण्यातून एक धक्कदायक प्रकार समोर आला होता. एका मनसैनिकाने राजीनामा दिल्याचे पत्र नगरसेवक वसंत मोरे यांना पाठवले होते. त्यावर नगरसेवक वसंत मोरे यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना आम्ही चाचा, मामु, खाला म्हणत मोठे झालो. ती लोक आमच्याकडे संशयाने बघायला लागली असल्याचे मोरे यांनी सांगितले.
मोरे म्हणाले, मी कधीही ठाकरे साहेबांवर नाराज होणार नाही. पण एक लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका लक्षात घेतली तर १५ वर्षे ज्या भागात लोकप्रतिनिधित्व करतोय त्याठिकाणी सर्व मुस्लिम बांधव माझ्या सोबत आहेत. त्यांचे आणि माझे जवळचे संबंध आहेत. त्या भाषणानंतर ती लोक दहशतीखाली गेली आहेत. ज्यांना आम्ही चाचा, मामु, खाला म्हणत मोठं झालोय. ती लोक आमच्याकडे संशयाने बघायला लागली आहेत. त्यामुळे मन व्यथित झालंय.
मुस्लिम बांधवानी गैरसमज करून घेऊ नये
मशीदवरील भोंगे बाबत आधीसुद्धा तक्रारी आल्या होत्या. राज्य सरकारने त्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. भोंगे काढले नाही तर आम्ही मशीद समोर हनुमान चालीसा लावू असं राज साहेब म्हणाले आहेत. त्याबाबत आमची अजून मिटिंग होणार आहे. त्यावर आम्ही विचार करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. वादाचे विषय होतील असा मुस्लिम बांधवानी गैरसमज करून घेऊ नये असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.