पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. त्यातच, आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन राज्यात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. मनसेचे कट्टर नेते वसंत मोरे यांनीसुद्धा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टिका केली आहे. याच नावं भगत सिंह ऐवजी कळीचा नारद पाहिजे होत असं ते म्हणाले आहेत.
राज्यात सर्वच पातळीवरून राज्यपालांवर टीकास्त्र सोडले जात आहे. अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. तसेच राज्यभरात कोश्यारी यांच्याविरोधात आंदोलने करत निषेध व्यक्त केला जात आहे. त्यातच वसंत मोरे यांनी कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. याच नावं भगत सिंह ऐवजी कळीचा नारद पाहिजे होत अशी जोरदार टीका त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली आहे. तर आमच्या राजांना एकेरी ना तर मग तू कोण लागून गेलाय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
पंतप्रधान महोदयांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आलीये - अजित पवार
''महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही मा. राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर मा. राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. मा. राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची मा. पंतप्रधान महोदयांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे. मा. राज्यपाल महोदयांना सद्बुद्धी लाभो, ही प्रार्थना!
काय म्हणाले होते राज्यपाल
आम्ही शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असे वाटते तुम्हाला कोणी विचारले तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत. मी आधुनिक युगाबाबत बोलत आहे. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.