पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्याविषयी बेताल वक्तव्य करून, त्यांना पुण्यात फिरू न देण्याचा इशारा दिला आहे. पण मोरे यांनी हा इशारा देण्यापूर्वी आपली क्षमता काय, आपण कोणावर टीका करतो, हे लक्षात घेण्याची, तसेच इतिहास समजून घेण्याची गरज असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे.
जगताप यांनी, गायकवाड यांच्याबाबत केलेल्या एकेरी आणि धमकीवजा वक्तव्याबाबत मोरे यांनी तत्काळ दिलगिरी व्यक्त करावी. तसेच त्यांनी निव्वळ प्रसिद्धीसाठी कोणावर टीका करण्यापूर्वी, त्या व्यक्तीचा इतिहास जाणून घेऊन महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतील त्यांचे योगदान लक्षात घ्यावे असेही सांगितले.
पुणे हे सुसंस्कृत शहर आहे. इथे तोडफोडीची, धमकीची भाषा कोणीही खपवून घेणार नाही. आमच्या अस्मितेचा विषय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि माँ जिजाऊंबद्दल लिहिल्या गेलेल्या अवमानकारक इतिहासलेखनाचे उदात्तीकरण आणि गौरवीकरण करू पाहणाऱ्यांना पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी यापूर्वीच धडा शिकवलेला आहे. त्यामुळेच, आमच्या अस्मितेचा अवमान करणाऱ्या राज ठाकरेंविरोधात प्रवीण गायकवाड यांनी घेतलेली भूमिका ही योग्यच असून, राष्ट्रवादी काँग्रेस, पुरोगामी कार्यकर्ते गायकवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही जगताप म्हणाले.
------------------------