जेजुरी : कुलदैवत खंडेरायाच्या मंदिर नियोजन व व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थान समितीवर नियुक्त करण्यात आलेल्या बाहेर गावातील पाच विश्वस्तांच्या निवड प्रक्रियेचा निषेध करत माठ फोडो आंदोलन करण्यात आले. शनिवारी (दि.३)आंदोलनाचा ९वा दिवस असून आजच्या आंदोलनात दुर्गामाता व मोरया मित्रमंडळाने सहभाग नोंदवला.
जोपर्यंत बाहेरगावातील पाच विश्वस्तांची निवड रद्द होत नाही तोपर्यंत शांततेच्या मार्गाने शहरातील सर्वधर्मीय सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ हा लढा सुरूच ठेवतील. पुढील काळात शहर बंद ठेवत सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येतील. आजच्या माठ फोडो व धरणे आंदोलनात जेष्ठ नागरिक संघ शहरातील व्यापारी व्यवसायिक,पुजारी, सेवेकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मनसे नेते वसंत मोरे यांचा आंदोलनात सहभाग
कात्रज पुणे येथील माजी नगरसेवक तथा मनसेचे नेते वसंत मोरे यांनी जेजुरीत दाखल होत आंदोलनास पाठींबा दर्शवला. जेजुरीकरांच्या भावना मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार
नवनियुक्त झालेल्या विश्वस्त मंडळाचा धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाकडील नियुक्ती आदेशाची प्रत प्राप्त झाली असून जेजुरीकर ग्रामस्थांच्या वतीने पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी सांगितले.