पुणे: हातात हातोडा किंवा भला मोठा सोटा, लाईव्ह येतोय, तयार रहा, अशी पोस्ट, मग मध्येच कधी तरी माझ्यामुळे ताईला घर मिळाले ची रिल, कधी हा माझा सख्खा मित्र म्हणून कोणाच्या तरी गळ्यात गळा... अशा सगळ्या पोस्टला लाखाच्या पुढच्या लाईक्स अन हजारोच्या कमेंटस्.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वसंत मोरे यांची स्टाईल अशी होती. तात्या म्हणून ओळख असलेले हे नगरसेवक मनसेच्या स्थापनेपासूनचे मनसैनिक. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचा पुण्यातील उजवा हात. पण समाजमाध्यमांवरील प्रसिद्धी वाढतच चालली, त्याचबरोबर पोस्टही, त्याला मिळणारे लाईकही..तेवढे बास होते. राज नाराज झाले, त्यांनी एकदा भर मिटिंगमध्ये कार्यकर्त्यांना समाजमाध्यमांचा जपून वापर करा म्हणून जाहीरपणे झापले. हे वसंतरावांनाच होते अशी माहिती लगोलग सगळीकडे पसरली. ती पसरवली गेली असा मोरे यांचा आरोप आहे. तोही त्यांनी समाजमाध्यमांवरून जाहीरपणेच केले. मग त्यांनी शहराध्यक्षपद सोडले तर त्यांना राज यांनी काढले अशा बातम्या आल्या.
मध्यंतरी एकदा एका सभेला ते आजारी नाहीत म्हणून आले नाहीत असे सांगितले गेले, तर सर्वांच्या आधी गाडी घेऊन हे हजर झाले व मी ठणठणीत आहे, हितशत्रूंनीच ही अफवा पसरवली असा आरोपही केला. हे हितशत्रू म्हणून मनसेचेच स्थानिक नेते असे त्यांचे म्हणणे. माझी प्रसिद्धी त्यांना खुपते यासाठी ते राज यांचे कान भरतात असा मोरे यांचा युक्तीवाद. एकदा दस्तुरखुद्द राज यांनीच बोलावून घेतले. बहुधा सगळेच नीट सांगितले. त्यानंतर काही दिवस मोरेंचे वारे शांत होते.
लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली अन या वाऱ्यात जोर आला. त्यांच्या परिसरात भावी खासदार म्हणून फलक लागले. तसेच शहरातील रिक्षांवरही ते फिरू लागले. एकमेव तात्या, बाकी सगळ्यांच्या नुसत्याच बाता असे काहीतरी समर्थक बोलू लागले. मोरे ज्या स्थानिक नेत्यांवर टीका करत होते, ते शांत होते, पण आतून कदाचित काम करत असतील, नसतील. ते त्यांनाच माहिती, पण मोरे यांच्या समर्थकांना डावलण्यात येऊ लागले. लोकसभा निवडणुक मनसेने लढवू नये, पुणे शहर लोकसभा तर मुळीच लढू नये, उगीचच पक्षाचे नाव जाईल असे अहवाल स्थानिकांकडून वरिष्ठांकडे जाऊ लागले. हाही मोरेंचाच आरोप.
मग याच आरोपाचा आधार घेत त्यांनी मंगळवारी मनसेला अखेरचा रामराम ठोकला. तोही त्यांच्या खास स्टाईलने. समाजमाध्यमांवर सगळीकडे दिसेल असाच. कार्यालयातील राज यांच्या प्रतिमेला त्यांनी सांष्टांग नमस्कार घातला. पत्रकारांबरोबर बोलताना त्यांचा कंठ भरून आला. मोरे शांत बसणाऱ्यांतले नाहीत. त्यांचे काहीतरी ठरलेले असणार. राज यांना त्यांनी पाठवलेल्या पत्रावर पुढच्या महिन्यातील १२ तारीख आहे. कदाचित असह्य होऊन त्यांनी आधीच बार उडवला असणार. ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात जातील अशी चर्चा आहे.
मोरे यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांची काही दिवसांपूर्वी त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली होती. तिथेच त्यांचे ठरले असे म्हणतात. पण मोरेंना हडपसरची विधानसभा द्यायची तर तिथे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व अन्य अनेक इच्छुकांनी आधीच रांग लावली आहे. दुसऱ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत अवघ्या काही हजार मतांनी पराभूत झालेले सचिन दोडके पक्षफुटीत शरद पवार यांच्याबरोबर राहिले ते खडकवासला भाजपचा मतदारसंघ आहे म्हणून. मोरेंना तिथून लढवायचे तर दोडके यांची अडचण होणार. त्यामुळेच तात्या आता नक्की करणार तरी काय, कि पुन्हा महापालिकेतच दिसणार असा प्रश्न मनसैनिकांच्या मनात आहे.