पुणे : बड्या बापाच्या बिघडलेल्या पोराने मद्यप्राशन करून आलिशान पोर्शे गाडीने दोन तरूण अभियत्यांचे बळी घेतल्याच्या प्रकरणात शनिवारी वंचित बहुजन विकासच्या वसंत मोरे यांनीही उडी घेतली. दोन्ही मृतांच्या निकटच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना त्यांनी यासंबधीचे निवेदन दिले.
मोरे म्हणाले, अपघातात दोन तरूण आयटी अभियंते मृत्यूमूखी पडले. हा सगळा विशाल अग्रवाल या बड्या बांधकाम व्यावसायिकांच्या निष्काळजीपणाचा, बेजबाबदारपणाचा परिणाम आहे. त्यामुळे त्याच्या संपत्तीमधील काही वाटा या दोन तरूण अभियत्यांच्या आई वडिलांना दिला पाहिजे. अपघात झालेल्या गाडीची कायदेशीर नोंदणी झालेली नाही. त्याचा विमाही काढलेला नाही. पोर्शे गाडीचा वितरक अग्रवाल यांनी आमच्या सुचनांचे पालन केले नाही असेच सांगेल. गाडीचे उत्पादक गाडीचा वापर नियमानुसार झाला नाही म्हणून हात वर करेल. मग या तरूण अभियंत्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांचे जे नुकसान झाले आहे ते कोण भरून देणार?
यावर एकच उपाय असल्याचे मोरे यांनी सांगितले व ते म्हणजे अग्रवालच्या संपत्तीमधील १० कोटी रूपये या दोन्ही तरूण अभियंत्यांच्या नातेवाईकांना देणे. अपघात करणारा मुलगा अल्पवयीन आहे, म्हणून त्याला वाहतूक नियमन करणे, निबंध लिहिणे अशी शिक्षा दिली जाते, मग कायद्यात मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई देण्याचीही तरतुद आहे, त्याचा वापर करावा. जी काही कायदेशीर पुर्तता असेल तरी जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण करावी व संबधितांना त्वरीत धनादेश द्यावेत अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याचे मोरे म्हणाले.
या प्रकरणात पडणारे मोरे हे पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील तिसरे उमेदवार आहेत. याआधी काँग्रेसचे उमेवार रविंद्र धंगेकर यांनी पोलिस व प्रशासनाला धारेवर धरत टीका केली. त्याला भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिले. त्यावर पुन्हा धंगेकर यांनी मोहोळ यांना तुम्ही बिल्डरांची वकिली का करता असा प्रश्न केला. आता वंचित विकासच्या वतीने निवडणूक लढवणाऱ्या मोरे यांनी आरोप- प्रत्यारोप किंवा टीका न करता थेट मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.