पुरंदर तालुक्याला प्रथमच वसंतराव ताकवले यांच्या रूपाने पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्षपद मिळाले आहे. पुणे जिल्ह्यात विविध शिक्षक संघटना असून, या सर्व संघटनांची वज्रमूठ बांधून त्यांना एकत्र आणण्याचे काम अनेक वर्षे वसंतराव ताकवले करत आहे. त्यांच्या कार्यामुळे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी त्यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे, असे गौरवोद्गार पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले की, पुरंदर तालुक्यातील शिक्षक संघटनेला कै. विठ्ठलराव ताकवले गुरुजी यांच्यापासून आजपर्यंत संघटनेचा शैक्षणिक दबदबा आहे. तो दबदबा कायम राहावा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण तालुक्यातील विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी शिक्षक भवन उभारणार असल्याचे सांगितले. या वेळी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी वसंतराव ताकवले यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या वेळी पुणे जिल्हा काँग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष रामप्रभू पेटकर, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष तानाजी झेंडे, हवेली तालुका कृती समितीचे पदाधिकारी दिलीपराव थोपटे, पुरंदर तालुका काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष प्रल्हाद गिरमे, पुरंदर तालुका क्रीडा संघटनेचे सचिव सोमनाथ उबाळे उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनीता जगताप यांनी तर आभार राजाराम पिसाळ यांनी मानले. या वेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी पुणे जिल्हा- शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ कॅलेंडरचे वाटप करण्यात आले.