पुणे : आपल्या देशाला उज्ज्वल परंपरा आहे. पुण्यात देखील खूप ऐतिहासिक गोष्टी आहेत. आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकाचा, आंबेगाव येथील शिवसृष्टी तसेच आर. के. लक्ष्मण यांची बाणेर येथील प्रदर्शनी यांचा पुणे दर्शनमध्ये समावेश करावा, तसे आदेश मी महापालिकेला देणार आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
फडके स्नेहवर्धिनी पुणे, पुणे पोलीस कार्यालय (सीआयडी, संगम ब्रिज) अधिकारी व सहकारी यांच्या सहकार्यातून व महा मेट्रो रेल्वे यांच्या योगदानातून संगम ब्रिज येथे आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे स्मारक, भित्तीशिल्पे व जतन करून ठेवलेली कोठडी तसेच भोवतालच्या संपूर्ण परिसरामध्ये दुरुस्ती व सुशोभिकरणाचे लोकार्पण मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना ब्रिटिश सरकारने ज्या कोठडीत आठ महिने बंदिवासात ठेवले होते त्या कोठडीस भेट तसेच फडके यांच्या कार्याविषयी माहिती देणारी भित्तीशिल्पे यांची पाहणी करून आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके व सत्यशोधक लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेस सुरुवातीस पाटील यांनी अभिवादन केले. या प्रसंगी इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयी उद्बोधन केले.
प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष बंडोपंत फडके यांनी फडके स्नेहवर्धिनीच्या उपक्रमांची माहिती दिली. मान्यवरांचे स्वागत बंडोपंत फडके, वि. गो. फडके, अभिजित फडके, द. वा. फडके, मोहन शेटे यांनी केले. सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष नंदकिशोर फडके यांनी मानले.