- दुष्यंत बनकर
उदापूर (पुणे) : आजही खेड्यापाड्यातून सकाळच्या प्रहरी येत असलेली वासुदेवाची स्वारी सध्या राज्यातून लोप पावत चालली आहे. त्यामुळे सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला... वासुदेव आला हो... वासुदेव आला... हा आवाज कानी पडत नसल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला लुप्त होत चालल्या आहेत. भावी पिढीला वासुदेवाची साद दुर्मीळ होणार आहे. कारण वासुदेव आणि त्याची कला लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
ग्रामीण भागात पहाटे लवकर उठून... वासुदेव आला होऽऽ, वासुदेव आलाऽऽऽ, सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला, वासुदेव आला होऽऽ, वासुदेव आलाऽऽऽ,” हे गाणं ऐकलं की रंगीबेरंगी पोशाखातील लोभस ध्यान डोळ्यांसमोर उभं राहत असे. पूर्वी गावात आलेल्या वासुदेवाला मान मिळायचा. लोक हातातले काम सोडून घटकाभर थबकायचे. त्याला दाद द्यायचे. वासुदेवाला दान देताना घरच्या लक्ष्मीचा हात कधी आखडत नसे. गावातून तृप्त होऊन वासुदेव परतायचा. परंतु काळानुरूप होत गेलेल्या बदलांमुळे वासुदेव हळूहळू लुप्त होत चालला आहे. पूर्वी थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या प्रहरी मोराची टोपी घातलेला एक व्यक्ती दारोदार फिरत असे. सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला... वासुदेव आला... हो वासुदेव आला... असे म्हणत नागरिकांमध्ये धर्म भावना जागृत करत दिवसाची प्रसन्न सुरुवात करण्याचे काम हा ' वासुदेव ' इमाने इतबारे करीत असे. कुणी मावल्या मग त्याच्या झोळीत पसाभर धान्य टाकत असत. तो संतुष्ट होऊन वासुदेव आला... हो वासुदेव आला... असे म्हणत पुढच्या दाराकडे वळत असे.
डोक्यावर मोरपिसांची किंवा निमुळती होत गेलेली कपड्यांची लांब टोपी, गळ्यात कवड्याच्या माळा, घोळदार अंगरखा, त्याखाली धोतर, कमरेला शेला, त्यात रोवलेली बासरी, पायात चाळ, एका हातात पितळी टाळ तर दुसऱ्या हातात चिपळ्या आणि मुखात अखंड हरिनाम घेत दिवसाची प्रसन्न सुरुवात करुन देणारा वासुदेव आजकाल दुर्मीळच झाला आहे. जुन्या काळात मराठी मुलखातील खेडोपाडी येणारी पहाट मोठी देखणी असायची. घराघरातून जात्यावरची गाणी म्हणत धान्य दळणाऱ्या महिला, गल्लीगल्लीत खांद्यावर कावड घेऊन आडावरून पाणी आणणारी माणसं अन् त्याचवेळी डोक्यावर मोरपिसांची उभट टोपी घातलेला, अंगात विशिष्ट प्रकारचा झगा, खाली विजार किंवा धोतर, कमरेला बांधलेलं उपरणं, कपाळावर आणि गळ्यावर गंधाचे टिळे, गळ्यात तुळशीच्या माळा, काखेला झोळी, पायात घुंगरू, हातात चिपळ्या, टाळ आणि मुखात भगवंताचे नाम म्हणत नाच करणारा वासुदेव दिसायचा.
अंगणात वासुदेव आला म्हणजे भाग्याची गोष्ट मानली जात असे कारण त्या रूपाने श्रीकृष्ण घरी आल्याचा आनंद होत असे. त्याचे दर्शन घडले की लहान मुले आनंदून जात. बायका माणसे सुपातून जोंधळे घालत आणि दान करत. पुरुष माणसे दुंडा पैसा देऊन त्याला नमस्कार करत. वासुदेव ही दान पावलं म्हणत अंगणात नाच करीत सारे अंगण जसे काही समाधानाने आनंदून जायचे परंतु हे चित्र मात्र सध्या ग्रामीण भागातून हद्दपार होऊ लागले आहे.
शहरातील दर्शन झाले अदृश्य -
खेडोपाडी अवचित दिसतो तरी, शहरांतून मात्र तो कधीच अदृश्य झाला आहे. मुळातच कृष्णभक्ती हा त्याच्या आयुष्याचा पाया असल्याने त्याच्या मुखात शक्यतो कृष्णलीला वर्णन करणारीच गाणी असतात. खरेतर वासुदेव ही समाज प्रबोधन करणारी एक संस्थाच होती असे म्हणायला हरकत नाही. अर्थात 'वासुदेव' या परंपरेची सुरुवात किमान १२०० वर्षांपूर्वीची तरी नक्कीच असावी. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांनी वासुदेवावर लिहिलेली रुपके आजही उपलब्ध आहेत.