Prakash Ambedkar Sharad Pawar Meeting ( Marathi News ) : लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी मित्रपक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत समाविष्ट होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर अद्याप महाविकास आघाडीकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं नसून त्यापूर्वीच वंचित आघाडीकडून लोकसभेच्या जागावाटपाचा प्रस्तावही मांडण्यात आला. अशातच काल प्रकाश आंबेडकर हे पुण्यातील मोदी बागेत पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. कारण याच मोदी बाग सोसायटीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचंही निवासस्थान आहे. मत्र मी या परिसरात राहणाऱ्या माझ्या बहिणीच्या भेटीसाठी आलो होतो, असा खुलासा आंबेडकर यांच्याकडून करण्यात आला आहे.
विरोधकांनी राष्ट्रीय स्तरावर सत्ताधारी भाजपला आव्हान देण्यासाठी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला सामावून घ्यावं, अशी सूचना शरद पवार यांच्याकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अजूनही अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी नुकतंच शरद पवार यांना पत्र लिहित महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी या चार पक्षांनी लोकसभेच्या प्रत्येकी १२ जागा लढाव्यात, असा प्रस्ताव मांडला आहे. एकीकडे ठाकरे गटाकडून संजय राऊत यांनी २३ जागा लढण्याची घोषणा केलेली असताना आंबेडकर यांनी १२ जागा लढण्यााबाबत मत मांडल्याने ही नवी आघाडी अस्तित्वाद येण्याआधीच वादाला तोंड फुटलं आहे. या पार्श्वभूमीवर जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी काल शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा रंगू लागली होती. मात्र आंबेडकरांनी या चर्चा फेटाळल्या आहेत.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस नेत्यांमध्येही गेल्या काही दिवसांपासून वाक् युद्ध रंगत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचितच्या राजकारणावर टीका केल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळे आगामी काळात वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होणार का आणि जागावाटपाचा तिढा सुटणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.