Vasant More On Pune Car Accident: कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या बाबतीतील बालहक्क न्यायालयाच्या निर्णयावर चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर, या न्यायालयाने जुना निर्णय बदलून, अल्पवयीन मुलाला १४ दिवस बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले. पुणे पोर्शे अपघात प्रकरणी राजकीय वर्तुळात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. यातच वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार वसंत मोरे यांनी या प्रकरणी स्पष्ट शब्दांत भाष्य करताना एक इशारा दिला आहे.
न्यायालयाने 'बाळा'ला काही अटींच्या आधारे जामीन मंजूर केला होता. यावर प्रचंड रोष व्यक्त झाला होता. अशातच आता पोलिसांनी अल्पवयीन आरोपीवर वाहन कायद्याच्या कलम १८५ अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल केला आणि पुन्हा एकदा त्याला न्यायालयात हजर केले. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अपघातावेळी ते बाळ दारू प्यायले होते, हे न्यायालयाला पटवून देण्यात पुणे पोलिस यशस्वी झाले. यानंतर आता वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये नेमके काय म्हटलेय?
कोरेगाव पार्कमध्ये जो अपघात झाला तो दुर्दैवीच होता..., पण त्यामागून जे राजकारण चालू दिसतंय त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते..., नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का? ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या त्या कोथरूड मधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील नाईट लाईफ विषयी लक्ष द्यावे, सोबतच भुगाव, पिरंगुट या भागाकडे म्हणजेच मुळशी कडेही लक्ष द्यावे, तसेच ज्यांनी निवेदन दिली त्यांनी सुद्धा एन आय बी एम कोंढवा भागाकडे सुद्धा लक्ष द्यावे, नाहीतर असे म्हणावे लागेल कोरेगाव पार्कमध्ये जाणारी तरुण पिढी दारू पिण्यासाठी जाते आणि वरील भागांमध्ये नाईट लाईफ साठी जाणारी तरुण पिढी नारळाचे पाणी पिण्यासाठी जाते का? कोणकोणत्या नेत्याचे कुठे कुठे नाईट लाईफ मध्ये लागेबांधे आहेत भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर जागेवर जाऊन लाईव्ह केले जातील... पोलीस यंत्रणेने फक्त कोरेगाव पार्क टारगेट न करता संपूर्ण पुणे शहर सुद्धा टार्गेट करावे... अन्यथा वंचित बहुजन आघाडी म्हणून जर कुठे हिंसक आंदोलन झाली तर त्याला संपूर्णपणे जबाबदार ही भ्रष्ट यंत्रणा असेल..., असे वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल, ब्लॅक पबचा कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश गावकर यांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने २४ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पुण्यात झालेल्या अपघातासंदर्भात मी स्वतः तेथील पोलिस आयुक्तांशी बोललो आहे. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. कायदेशीर, कठोर कारवाई केली जाईल; तसेच कायदा, सुव्यवस्था राखण्याचे आदेश पोलिस आयुक्तांना दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.