- पांडुरंग मरगजे
धनकवडी (पुणे) : अडथळ्यांना शिडी बनवून जो यश मिळवतो तोच खरा यशवंत ठरतो. सरहद्द महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थी वेदांत चक्के याने ८५ टक्के दृष्टी अंधत्वावर मात करत वाणिज्य शाखेतून घवघवीत यश मिळवत ८४% गुण प्राप्त केले असून त्याचे कलेक्टर होण्याचे त्याचे स्वप्न आहे.
कितीही संकटे असली तरी यशाचे शिखर सर केले जाते. सरहद्द स्कूल मध्ये शिकत असलेल्या वेदांत चक्के या दिव्यांग विद्यार्थ्यांने दाखवून दिले. कलेक्टर व्हायचे या एकाच इराद्याने वेदांतने बारावीच्या परीक्षेत रायटरच्या मदतीने ८४ टक्के गुण मिळवत अपंगत्वावर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
वेदांतला जन्मतःच दृष्टीदोष होता, उत्तरोत्तर दृष्टीदोष वाढत जाऊन नववी पर्यंत तो ८५ % वर जाऊन पोहोचला. त्याचे प्राथमिक शिक्षण भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये झाले तर बारावी साठी त्याने सरहद्दमध्ये प्रवेश घेतला. दोन्ही डोळ्यांना अंधत्व आल्याने वेदांतला अजिबात वाचता येत नाही, मात्र तल्लख बुद्धिमत्ता असल्यामुळे केवळ ऐकून तो अभ्यास करतो. वेदांतने दहावीच्या परीक्षेतसुद्धा रायटर अर्थात लेखनिकाच्या मदतीने परीक्षा देत ८७ टक्के गुण मिळवले होते.
बारावीच्या परीक्षेमध्ये त्याला सोबतच्या विद्यार्थी मित्रांची चांगली साथ मिळाली. शिक्षक, पालक, विद्यार्थी मित्रांचे सहकार्य आणि कठोर परिश्रमाच्या बळावर आपण हे यश मिळवू शकलो, असे वेदांतने सांगितले. वेदांत म्हणाला, जिद्द, परिश्रम मेहनतीच्या बळावर आपण कोणत्याही अडथळ्यांवर मात करू शकतो. नियमित अभ्यास हाच हमखास यशाचा सिक्रेट फार्मुला असून मला भविष्यात कलेक्टर व्हायचं आहे.